बीड : मस्साजोगचे सरपंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, असा आरोप जामिनावर सुटलेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने केला आहे. न्यायालयीन कोठडीत असताना स्वतःच्या डोळ्यांनी वाल्मिक कराडला मिळत असलेली विशेष वागणूक बघितली; असे रणजित कासलेने सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याने ही माहिती सार्वजनिक केली आहे.
वाल्मिक कराडला दररोज तुरुंगामध्ये पोटभर जेवण दिले जाते. चांगल्या कपात गरम चहा मिळतो. जेवणाव्यतिरिक्त एरवी खाण्यापिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण, चिवडे मिळतात. जेवणासाठी त्याला तेल लावलेल्या गरमागरम मऊ लुसलुशीत पोळ्या मिळतात. दर बुधवारी आणि रविवारी पोटभर चिकन दिले जाते. हे सगळे स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याचे जामिनावर सुटलेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने सांगितले. तुरुंग प्रशासनाने काही दिवसांतच मला दुसऱ्या कोठडीत ठेवले. मला वाल्मिकच्या हालचाली लगेच कळू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. एवढे करुनही मी वाल्मिकला मिळणाऱ्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त करतोय हे लक्षात आल्यावर मला जामीन मिळावा यासाठी हालचाली झाल्या, असा दावा रणजित कासलेने केला आहे.
कासलेवर अॅट्रॉसिटी, फसवणूक तसेच निवडणूक काळातील दोन गुन्हे अशा एकूण चार गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमुळेच त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. नुकताच तो जामीन मिळाल्यामुळे तुरुंगाबाहेर आला आहे. बाहेर आल्यावर सोशल मीडिया पोस्ट करुन रणजित कासले नव्याने चर्चेत आला आहे.