
शासन निर्णय जारी
मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या वाहनांमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य महामार्गावर पथकरातून लवकरच विद्युत वाहनांना मुक्ती देण्यात येणार आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग व अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा-शेवा सेतूवर विद्युत वाहनांना पथकरातून पूर्णपणे माफी देण्याचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.
विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने नवीन धोरण आणले आहे. मंत्रिमंडळाच्या २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु, याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला नव्हता. या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. माफ करण्यात येणाऱ्या पथकर माफीच्या रकमेची प्रतिपूर्ती अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे परिवहन विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास करण्यात येईल.