
डॉ. वीणा सानेकर
खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतला एक प्रसंग मला स्तिमित करतो. दारी आलेल्या भविष्य पाहण्याचा दावा करणाऱ्या कुडमुड्या ज्योतिष्याला बहिणाबाई म्हणतात,
बापा नको मारू थापा
असो खऱ्या, असो खोट्या
नाही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या
नको नको रे ज्योतिषा
नको हात माजा पाहू
माझे दैव मले कये
माझ्या दारी नको येऊ
कवितेत आलेला हा अनुभव बहिणाबाईंच्या आयुष्याशी जोडलेला होता. ‘माझे नशीब मला कळते’ असे म्हणण्याची ताकद या साध्यासुध्या बाईमध्ये होती. तिच्याशी नाते सांगणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक स्त्रियांनी आपल्या आत्मसामर्थ्यावर आपले संसार तोलून धरले.
स्वतःची जीवनकथा सांगणे कोणत्याही माणसाला शक्य आहे हा विश्वास मराठीतील ‘आत्मकथन’ या साहित्यप्रकाराने समाजाला दिला. मुख्य म्हणजे आपली कथा व्यथा सांगणारी अनेक आत्मकथने अनेक स्त्रियांनी मराठीत लिहिली आहेत.
पुस्तकांवर नि माणसांवर प्रेम करणाऱ्या ८६ वर्षांच्या कौसल्याताई पेटकर यांचे ‘कौसल्यायन’ माझ्या हाती आले आणि त्या पुस्तकाच्या सरळसाध्या शैलीने मला गुंतवून ठेवले.
या पुस्तकातील लोककला निलोकगीतांबद्दलचा भाग ग्रामीण शिवार आणि परंपरांची खूप सुंदर ओळख करून देतो. ‘बैलपोळा’ या सणाचे वर्णन करताना पळसाच्या छोट्या फांद्या एकत्र करून, धाग्याने बांधून हळद तेलाचे मिश्रण करून बैलाचे खांदे शेकले जातात, असा उल्लेख येतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना’ आज आवतन घ्या, उद्या जेवायला या ‘असे जेवण्याचे आमंत्रण दिले जाते. बैलांसाठी पोळ्याच्या सणाला म्हटलेल्या गीतांना ‘झडत्या’ असे म्हटले जाते. वर्तमान काळातील सामाजिक समस्यावर या गीतातून टीका केली जाते. गरिबी, महागाई, भ्रष्टाचार असे विविध विषय व्यंगात्मक शैलीत या गीतांमध्ये गुंफलेले असतात, अशी उदाहरणे कौसल्याताई पुढीलप्रमाणे अगदी सहज देतात.
“पारबतीच्या लुगड्याले छपन्न गाठी
देव कवा धावल गरिबांसाठी”
देवालाच या ओळीत थेट प्रश्न विचारला आहे.
चंद्रपूरमधील ‘रामायण’ नावाच्या लोककलाप्रकाराचे संदर्भ काळाच्या ओघात लुप्त झालेले असले तरी त्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत. राजा, त्याच्या दोन राण्या, प्रधान अशी पात्रे या रामायणात असायची. हे लोकरामायण पाहायला घरून गोधडी घेऊन गावकरी जायचे. पूर्वी गावात मनोरंजनाची विशेष साधने नव्हती त्यामुळे रात्री गावकरी या कलेत रमायचे.
आणखी एक गोष्ट गावातील स्त्रियांना जगण्याची उमेद द्यायची. ती गोष्ट म्हणजे गाणी. कौसल्याताईंची अशी धारणा आहे की, गाणे शेतातील कष्ट हलके करते. दळणकांडणातील कंटाळवाणा वेळ सुरम्य करते. घरापासून, आई-बाबा व भावाबहिणीपासून होणारी नवऱ्या मुलीची ताटातूट हलकी करते. बाळाला शांत झोपवण्यासाठी आई अंगाई गाते. प्रत्येकाला काही ना काही दुःख आणि अडचणी असतात, त्या संकटात थोडीफार हळवी झुळूक गाणी घेऊन येतात.
शेतातल्या कामांमध्ये किंवा कठीण प्रसंगांमध्ये गाण्यांनीच विसावा दिला असे म्हणणाऱ्या कौसल्याताई आयुष्याचे गाणे आनंदाने गात आहेत. काळ्या मातीचे वरदान लाभलेल्या ग्रामीण भागातली स्त्री कष्टाला घाबरत नाही. मुलाबाळांमध्ये रमणारी, कुटुंबासाठी जगणारी स्त्री दुःखांना हसत हसत सामोरी जाते. तिच्या आयुष्याची सुफळ संपूर्ण कहाणी अनेक पिढ्यांना प्रेरणा देते.