
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
भृगू ऋषींना दोन पत्नी होत्या. एक हिरण्यकश्यपूची मुलगी दिव्या व दुसरी दानवराज पूलोमची राजकन्या पौलवी. पौलवी गर्भवती असताना पूलोमन नावाच्या राक्षसाने तिला पळविले. त्यावेळी झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे तिचा गर्भपात झाला व तो गर्भ गळून गवतावर पडला म्हणून त्याचे नाव च्यवन (गळून पडणे) असे पडले. तो बालक अतिशय तेजस्वी होता. त्याच्या तेजामुळे तो पूलोमन राक्षस जळून ठार झाला. पौलमी या बालकाला घेऊन भृगूच्या आश्रमात आली. च्यवनला लहानपणापासूनच जपातपाची आवड होती.
एकदा च्यवन ऋषी तपश्चर्येत मग्न असताना बराच कालावधी लोटला. त्यांच्या अंगावर वारूळ चढले. त्यावेळी मनुपुत्र राजा शर्यती आपल्या लवाजम्यासह वनात आला होता. त्याची मुलगी सुकन्या ही आपल्या सखी व दासींसह वनात विहार करत असताना तिने एका वारुळातून काजव्या याप्रमाणे दोन ज्योती चमकताना पाहिल्या. उत्सुकता वश तिने हातातील काडी त्या छिद्रात घातली. तेव्हा त्या काडीला रक्त लागल्याचे तिला दिसले. ते पाहून ती घाबरून सर्वांसह तेथून निघून गेली. त्यानंतर काही वेळातच राजाच्या सैन्याचे मलमूत्र बंद झाल्याचे आढळून आले. तेव्हा कोणी एखाद्या महामुनींची खोड तर काढली नाही ना अशी राजाने चौकशी केली असता, सुकन्याने घडलेला प्रकार सांगितला. राजा वारूळाजवळ आला असता त्यांनी त्या ठिकाणी ऋषी च्यवनला पाहिले. काडी टोचल्यामुळे ऋषी च्यवनाचे डोळे आंधळे झाले होते. राजाला व सुकन्येला अत्यंत वाईट वाटले व पश्चात्ताप झाला. प्रायश्चित्त म्हणून राजाने सुकन्येचा विवाह च्यवन ऋषींशी लावून दिला.
सुकन्याने मनोभावे ऋषी च्यवनाची सुश्रूषा केली. एकदा अश्विनी कुमार च्यवन ऋषींच्या आश्रमात आले असता ऋषींनी त्यांचा आदर सत्कार केला व म्हातारपण आलेल्या आपल्या शरीराला तारुण्य प्रदान करण्याची विनंती अश्विनी कुमारांना केली. अश्विनी कुमारांनी त्यांना आपल्या सोबत घेऊन एका सिद्ध केलेल्या कुंडात स्नान केले. स्नानानंतर तिघेही कुंडातून बाहेर येताच सुकन्येला तीन सुस्वरूप सुंदर तरुण बाहेर आलेले दिसले. त्यामधून आपला पती नेमका कोणता हे सुकन्येला ओळखता येईना. अखेर तिने अश्विनी कुमारांची प्रार्थना केली व त्यांना शरण गेली. तेव्हा अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषींकडे अंगुलीनिर्देश केला. ऋषींनीही परतफेड म्हणून अश्विनी कुमारांना यज्ञात सोमरस पानाचा अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच अश्विनी कुमाराच्या आशीर्वादाने च्यवन ऋषींनी चिरतरुण राहण्याचे औषध बनविले.
एकदा यज्ञाचे आमंत्रण देण्यासाठी राजा शर्याती च्यवन ऋषींच्या आश्रमात आला, तेव्हा आपल्या मुलीला एका सुंदर युवकासोबत पाहून त्याला राग आला व त्याने सुकन्याला दूषणे देण्यास सुरुवात केली. तेव्हा सुकन्येने त्यांना थांबवून हा तरुण म्हणजे तुमचा जावईच आहे हे सांगून सर्व हकीकत सांगितली. ती एेकून राजालाही अत्यंत आनंद झाला. च्यवन ऋषींनी राजा शर्यातीकडून एका यज्ञाचे अनुष्ठान करविले व अश्विनी कुमारांना सोमरसपान करविले.
यामुळे इंद्र व अन्य देवता नाराज झाल्या. इंद्र वज्र घेऊन च्यवन ऋषींना मारण्यासाठी धावला. तेव्हा ऋषींनी त्याचा तो हात हवेतच स्थिर केला. अखेर इंद्र व सर्व देवांनी अश्विनी कुमारांचा सोमरसपानाचा अधिकार मान्य केला. अश्विनी कुमार वैद्य असल्याने त्यांना सोमरस पानाचा अधिकार नव्हता.
एका मान्यतेनुसार च्यवन ऋषींचा आश्रम व तपोभूमी हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यातील नारनौल जवळ ढोसी पाहाडात होता, तर पद्मपुराणानुसार त्यांचा आश्रम सातपुडा पर्वतातील पयोष्णी नदीच्या काठी होता. च्यवन ऋषी “च्यवन भार्गव’’ या नावानेही ओळखले जातात. ते आयुर्वेद व ज्योतिष शास्त्राचे ज्ञानी होते. त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे.