
संगमनेर : संगमनेर शहरातील वाहतुक प्रश्नांबाबत माहिती घेणार असून याबाबत लवकरच कडक पावले उचलली जातील. तसेच येथील सिग्नल देखील पुढील महिन्यात सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोमनाथ घार्गे यांनी स्वीकारल्यानंतर आज शनिवार दिनांक २४ मे २०२५ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली.यावेळी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, संगमनेर विभागाचे पोलिस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे म्हणाले की, संगमनेर येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचे समजले असून याबाबत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या सोबत चर्चा झाली आहे.शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख व मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची एक टीम याबाबत सर्वे करणार आहे.त्यानंतर याबाबत त्वरित निर्णय घेण्यात येईल.
पुढील महिन्यात दिनांक १५ जून २०२५ पर्यंत संगमनेर शहरातील दोन ते तीन चांगले चौक फायनल करून याठिकाणी असलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर संगमनेर शहरातील बंद असलेले सीसीटिव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बंद आहेत ते सर्व सुरू करण्यात येतील, जेणेकरून पोलिसांना देखील त्याची मदत होईल. तसेच संगमनेर शहर पोलिस ठाण्यात जरी पोलिसांचे संख्या बळ कमी असेल तरी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी संख्या बळाची माहिती घेवून पोलिसांचे संख्या बळ कसे वाढवता येईल याबाबत प्रयत्न करणार आहे. तर जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंदे याबाबत प्रत्येक तालुक्यात कडक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.