Saturday, May 24, 2025

कोलाज

निसर्गसंपन्न आणि सुरक्षित शिलाँग

निसर्गसंपन्न आणि सुरक्षित शिलाँग

विशेष : मृणालिनी कुलकर्णी


भारताच्या ईशान्य भागात स्थित असलेल्या सात भगिनी राज्यांपैकी एक मेघालय! ढगांचे निवासस्थान! येथे ढग जमिनीवर येतात. डोंगरांनी वेढलेले उंच पठार! भौगोलिक आणि जैवविविधतेच्या दृष्ट्या संपन्न! मेघालयाच्या बाजूला आसाम आणि बांगलादेश आहेत. १९७२ मध्ये मेघालय राज्याच्या निर्मितीनंतर मेघालयचे तीन टेकड्यांत विभाजन झाले. खासी टेकडी, गारो टेकडी आणि जैतिया टेकडी.


खासी टेकडीवर वसलेले शहर शिलाँग, हे एक हिल स्टेशन असून मेघालयाच्या नैसर्गिक लँड्स्केपचे प्रवेशद्वारही आहे. मेघालयची राजधानी िशलाँग असून ते सर्वात मोठे, लोकप्रिय आणि पर्यटकांचे आवडते स्थळ आहे.


धुक्यात हरवलेले शिलाँग पाहणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. फोटो काढेपर्यंत ढग पुढे सरकतात. हिरव्यागार टेकड्या, पाहावे तेथे पाण्याचे कोसळणारे धबधबे, बोटिंगसाठी जलाशय, दऱ्याखोऱ्यांना कमतरता नाही, अनेक विविध प्रजातींच्या झाडांनी घेरलेली जंगले, थंड हवामान म्हणूनच िशलाँगला पूर्वेकडील स्कॉटलंड म्हणतात. याशिवाय साहसी लोकांसाठी हायकिंग, ट्रेकिंग, जंगलातील ट्रेल्स, गाडी चालवणे, संगीत, जोडीला खाणे असे जुन्या आणि आधुनिक, सांस्कृतिकचे मिश्रण आहे. त्यासाठी मुक्काम आवश्यक.


प्राकृतिक सौंदर्याबरोबरच मेघालय - शिलाँगमधील वैशिट्य -१) येथे चुनखडीमुळे सिमेंटची मुबलकता असूनही येथील खासी -आदिवासी लोक कार्बनपासून दूर झाडांच्या जवळ राहतात. या लोकांनी रबराच्या झाडाच्या मुळांपासून तयार केलेली नदी पार करण्यासाठी मजबूत ब्रिज. डबलडेकरसुद्धा. ब्रिज करायाला २५ वर्षे लागतात आणि ५०० वर्षे टिकतात. रस्त्यात इतरत्र बांबूचे ब्रिज, बाके, शंकूच्या आकाराचे डस्ट बिन साऱ्या वस्तू झाडापासून केलेल्या. २) येथील खासी लोकांचा वांशिक समूह आहे. भाषा खासी. खासी लोकांचा पारंपरिक ‘जैन सेम’ हा पोशाख वैशिट्यपूर्ण आहे.
खासी जमातीत महिला प्रधान संस्कृती असून ती घरात कर्ती असते. लग्नानंतर मुलगा मुलीकडे जातो. डोंगरात राहणारे हे खरे गिरिजन. ब्रिटिशानमुळे ते ख्रिश्चन झाले. ३) खासी रहिवाशांना संगीताची प्रचंड आवड. वर्षभर येथे पाश्चात्त्य संगीताच्या मैफली होतात. या रॉक संगीतामुळेच शिलॉंग ही भारताची रॉक संगीताची राजधानी आहे. कडक उन्हाळा, गर्दीपासून दूर चलो, - ‘निसर्गसंपन्न आणि सुरक्षित शिलॉंग.’


एप्रिल अखेर आम्ही चौघेजण विमानाने गुवाहाटीला नातलगांकडे राहिलो. दोन रात्र तीन दिवसांसाठी त्यांनीच पूर्ण प्रवासासाठी गाडी, राहण्याची सोय केली होती. गुवाहाटीपासून शिलॉंग १०० किलोमीटरवर. आमच्यासोबत झाडे-डोंगरही पळत होते. थोड्याच वेळांत अतिशय मोठा मानवनिर्मित स्वच्छ पाण्याचा तलाव पाहिला.


उमियम (बारापानी) तलाव. या तलावाला तीन-चार ठिकाणी देखावा पाहण्यासाठी (व्हू पॉइंट) सोय आहे. चारी बाजूने हिरवाई, तलावात बोटिंग, पाण्यातले खेळ खेळले जातात. या पाण्यावर धरण बांधून जलविद्युतकेंद्र उभारले आहे. तलावाभोवती गाडीने फेरी मारणे हा एक सुखद अनुभव. पर्यटकांसाठी, कुटुंबासाठी आनंदायी विकसित असा हा उमियम तलाव. वाटेत मोकळ्या परिसरातील वाह काबा धबधबा पाहिला.


शिलाँग पर्यटनातील प्रसिद्ध स्थळ ‘एलिफंट फॉल्स’. तीन स्तरीय धबधब्याचे सौंदर्य पायऱ्या असलेल्या पुलामुळे आम्ही सर्व बाजूने पाहिला. सुरुवातीलाच झाडामध्ये पहिला धबधबा जरा दुरूनच पाहिला. काही पायऱ्यांनंतर कठड्याजवळून दुसरा दिसतो. अंदाजे एकूण १०० पायऱ्या उतरल्यानंतर तिन्ही टप्यातले पाणी अखंड प्रवाहाने पायथ्याशी असलेल्या हत्तीच्या आकारासारख्या दगडावर पडून उडणारे तुषार अंगार अनुभवले. हा जलप्रपात जवळून पाहतो. आता दगडाचा आकार हत्तीसारखा राहिला नाही. पडलेल्या पाण्याचा जलाशय, तेथील मोठे मोठे दगड, पाण्यांत चालायला... मस्त.


मेघालय हे गुहा प्रणालीचे घर आहे. सर्वत्र धबधबे पाहताना चेरापुंजीच्या मार्गातील ‘आरवाह गुहा’ बघितली. येथे थोड्या पायऱ्या, थोडे सरळ असे अर्धा तास चालणे आहे. चुनखडी आणि जीवाष्मासाठी प्रसिद्ध असलेली ही एक विशाल गुहा आहे. आत प्रकाश आहे तरी टॉर्च असल्यास उत्तम. कारण पृष्ठभाग असमान, उंची कमी आहे तरी धोका नाही. सर्व वयोगटातील लोक जात होते.


ढगांच्या निवासस्थानातील सर्वात उंच असा ‘नोहाकालिका धबधबा’. एका बाजूने लांबवर पसरलेला डोंगराचा पट्टा, वरती गर्द हिरव्या झाडामुळे पाण्याचा उगम दिसत नाही. दोन-तीन कडेकपारीतून पाणी खोलवर दरीत पडताना पाहत असताना, दुसरीकडे तिन्हीसांजेच्या सूर्यास्ताचेही आम्ही साक्षीदार झालो.
दुसऱ्या दिवशी स्फटिकासारखे पारदर्शक स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालयमधील डावकी नदीवर गेलो. पर्यटकांची बोटिंगसाठी प्रचंड गर्दी. सुरुवातीपेक्षा बोट जसजशी पुढे जाते तसे खरोखर पाण्याचा खालचा तळ स्पष्ट दिसतो. दोन्ही बाजूला प्रचंड मोठे दगड, त्यावर हिरवी झाडे, काही घरे, समोरच खासी आणि जैतिया पर्वतांना जोडणारा ब्रिटिशकाळांतील कर्षण सेतू. समोरून जाणाऱ्या गाड्या पाहत निसर्ग टिपून घेतला. अर्थजनासाठी हे ठिकाण तेजीत. नदीच्या पाण्याच्या बाहेर पसरलेल्या दगडातून एक रेघ भारत आणि बांगलादेशाला वेगळी करते. हीच भारत-बांगलादेशाची सीमा होय.


भारतीय रक्षक आपल्याला तिकडे जाऊ नका असे सांगतात. या नदीमार्गे रोजगारासाठी ये-जा करणारे बांगलादेशी पाहिले. बांगलादेशीय भारतात येतात हे वाचलेले आठवले. डावकी आणि एशियातील सर्वात स्वच्छ गाव मावलयनॉन्ग ही दोन्ही गावे भारत-बांगलादेशच्या सीमेवर आहेत. डावकी नदी (उमंगोट) डावकी आणि मावलयनॉन्ग गावातून जैतिया आणि खासी पर्वतरांगांमधून पुढे बांगलादेशात जाते. डावकीच्या जवळ काही अंतरावर भारत आणि बांगलादेशाची सीमा पाहिली. तिथे आपल्या सरहद्दीत आपला आणि त्यांच्या सरहद्दीत त्यांचा ध्वज फडकत होता. आपला भारताचा तिरंगा पाहताना गलबलून आले. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रासाठी ‘सुतारकोडी’ ही भारत-बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. तेथे भारताचे प्रमुख चेक पोस्ट आहे. येथे अर्धा दिवस जातो.


मावलयनॉन्ग या स्वच्छ गावात थोडेचं फिरलो. त्याआधी एके ठिकाणी जिवंत झाडाच्या मुळापासून तयार झालेल्या ब्रीजवरून चाललो. निसर्गाची जादू अनुभवली. बाजूला पाण्याचा धबधबा. तेथे ट्रेकिंगसाठी जवानांची टूर आली होती.


तिसऱ्या दिवशी शिलॉंगमध्ये असलेल्या काही चर्चपैकी सर्वात मोठे आणि प्रसिद्ध ‘मेरीचे कॅथड्रेल चर्च’ या शांत परिसरास भेट दिली. या चर्चची निळ्या रंगाची छटा (मेघालय नावाला साजेसा) लक्ष वेधून घेते. सकाळची वेळ व्यायाम, योगा, चालणे, ओपन जिम, मुलांसाठी खेळ अशा सर्वांसाठी विचारपूर्वक आखणी केलेले सुंदर ‘वॉर्ड्स लेक’. येथे बोटिंग बंद आहे. पाण्यात छोटे मासे पाहिले. विविध प्रकारच्या वेगवेगळ्या रंगातील फुललेल्या फुलांनी सकाळ प्रसन्न केली. बागेचा आकार घोड्याच्या नालेसारखा. मध्यभागचा लाकडी पूल नजर खेचून घेतो.


शांत वातावरणातून खूप गर्दी, गजबजलेल्या भागाकडे गेलो. शिलाँगची प्रमुख बाजारपेठ, प्रमुख खरेदी केंद्र खाण्यासाठी हॉटेल्स, राहण्यासाठी होम स्टे, गेस्ट हाऊस, हॉटेल्स, सारे उपलब्ध असलेला ‘पोलीस बाजार’. आम्ही येथे थोडा खाण्याचा स्वाद घेतला. ईशान्यकडील सात राज्यांच्या संस्कृतीचे पंरपरेचे प्रतीक असलेले सात मजली ‘डॉंन बास्को म्युझियम ‘. अतिशय अभ्यासपूर्ण, भव्य. सहज दोन तास लागतात. सर्वात वरती गोलाकार सुरक्षित टेरेसवरून (स्काय वॉक) फेरी मारताना परत पूर्ण शिलाँग पाहतो. जाता जाता. शिलाँगचे सर्वोच्च शिखर 'शिलाँग पीक ’. येथे भारताच्या हवाई दलाचे रडार स्टेशन असल्याने इतर वाहने ठरावीक अंतरानंतर आत येऊ शकत नाहीत. थोड्या अंतरासाठी टॅक्सीची सोय आहे. “आय लव्ह शिलाँग” ही खास फोटोची जागा. टेरेससारखा मोठा कॅरीडॉर, दोन्ही बाजूला निरीक्षण टॉवर. शिलाँगचे परत पूर्ण दर्शन! संपूर्ण शिलाँग प्रवासांत प्रत्येक ठिकाणी प्रवेश शुल्क आहे. सतत फिरताना फुलझाडांनी फुललेले झाड पाहताना घरात केर काढण्यासाठी वापरतो तो झाडू म्हणजे एका फुलझाडाच्या फांद्यांपासून बनवलेला! हा विचारच मनात शिवला नव्हता. असो. असे हे निसर्ग संपन्न आणि सुरक्षित शिलाँग!



[email protected]

Comments
Add Comment