
कोपरगाव : आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांची शिर्डी आणि वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग विठोबा या दोन श्रद्धा स्थानांना जोडणारी शिर्डी मुंबई पंढरपूर अशी जलद गती पॅसेंजर रेल्वे गाडी पाच वर्षापूर्वी सुरू होती, मात्र ती आता शिर्डी मुंबई पर्यंतच चालवली जाते त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांनी ही रेल्वे सेवा शिर्डी ते पंढरपूर पर्यंत न्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी, वारकऱ्यांनी संबंधित रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अवघ्या ११० रुपयात शिर्डी ते पंढरपूर असा प्रवास वारकऱ्यांचा होत होता, मात्र पाच वर्षापासून ही रेल्वे सेवा खंडित करण्यात आली आहे, सदर शिर्डी पंढरपूर ही रेल्वे सकाळी पाच वाजता हसायची साडेबारापर्यंत पंढरपूरला पोहोचायची, मात्र ती आता बंद आहे त्यामुळे अनेक वारकऱ्यांसह भाविकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. पंढरीचा पांडुरंग अनेक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे, तर पंढरपुरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान साईबाबांची शिर्डी आहे. या दोन धार्मिक स्थळावरील भाविकांसह प्रवाशांना ही रेल्वे सेवा अत्यंत सुलभ होती पण ती सध्या शिर्डी ते मुंबई पर्यंत चालविली जाते, त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूर आणि शिर्डीला ये जा करायची असते ते या सेवेपासून गेल्या पाच वर्षापासून वंचित आहेत.
आषाढी एकादशी काही दिवसावर येऊन ठेपली आहे. शिर्डी मुंबई पंढरपूर अशी सेवा सुरू झाली तर वारकऱ्यांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. वयोवृद्ध वारकऱ्यांसह भाविकांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे वाटते त्यासाठी ते एस.टी ऐवजी रेल्वे सेवेला प्राधान्य देतात, तेव्हा रेल्वे विभागाने शिर्डी मुंबई जलद गती पॅसेंजर सेवा थेट पंढरपूर पर्यंत सुरू करण्यात यावीअशी मागणी केली आहे.