Saturday, May 24, 2025

कोलाज

संशोधक घडवणारा शास्त्रज्ञ

संशोधक घडवणारा शास्त्रज्ञ

प्रासंगिक : वरुण भालेराव - शास्त्रज्ञ


डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन ही भारतालाच नव्हे तर जगाला धक्का देऊन गेलेली बाब आहे. सरांनी विज्ञानविश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिलेच, खेरीज आपल्या दर्जेदार साहित्यातून सर्वसामान्यांपर्यंत वैज्ञानिक विचार पोहोचवण्याचेही काम केले. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांची शिस्तप्रियता, अचूकतेचा अट्टहास, कोणत्याही विषयावरील चर्चेत भाग घेत नेमके मत मांडण्याची हातोटी नेहमीच लक्षात राहील.


डॉ. जयंत नारळीकर इतर अनेकांप्रमाणे माझ्यासाठीही रोल मॉडेल होते. किंबहुना, मी खगोलशास्त्रामध्ये कार्यरत होण्यामागील प्रेरणास्थान असणारे हे नाव होते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. त्यांनी ‌‘आयुका‌’ची स्थापना केली, तेव्हाच आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याकडे लक्ष देण्याचेही ठरवले. म्हणजे या संस्थेत महत्त्वपूर्ण संशोधन करायचे, त्यासाठी लोकांना तिथे आणायचेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठीही धोरणे राबवायची हे त्यांचे धोरण आधीपासूनच निश्चित होते. ‌‘आयुका‌’च्या ध्येयाचा तो एक भाग होता. त्यामुळे या मार्गानेही संस्था मोठे काम करू शकली.


संस्थेबरोबरच त्यांनी स्वत:च्या विज्ञानविषयक लेखनातून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मराठीमध्ये अनेक लेख, गोष्टी लिहिल्या. या सगळ्यांमुळे पुण्यामध्ये ‌‘आयुका‌’च्या उपक्रमांची नेहमीच मोठी चर्चा असायची. तिथे विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने असायची, उन्हाळी सुट्टीमध्ये काही खास उपक्रमांची आखणी केली जायची. अशा कार्यक्रमांमधून एवढा महान शास्त्रज्ञ तुमच्यापुढे येतो, त्याला प्रत्यक्ष बघता येते तेव्हा विलक्षण प्रभाव पडणे स्वाभाविक असते. मी तेच अनुभवले. ‌‘आयुका‌’च्या उपक्रमांमधूनच मी खगोलशास्त्रात पहिले पाऊल ठेवले. त्यांच्याकडे बघतच मोठा झालो. आयुकाच्याच कार्यक्रमांमधून माझ्या मनात या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. इंटर स्कूल ऑलपियाडमधून मी इथे प्रवेश केला आणि खगोलशास्त्राविषयीची आवड दृढ होत गेली. त्यामुळेच आज या क्षेत्रात कार्यरत आहे. अर्थातच डॉ. नारळीकरांमुळे, त्यांच्या कामाच्या प्रभावानेच हे घडू शकले यात शंका नाही. केवळ मीच नव्हे, तर माझ्यासारखे अनेकजण त्यांच्यापासून प्रेरणा घेत इथे आले आहेत. खगोलशास्त्राचा विचार केला तर आज जगात भारताची खास प्रतिमा निर्माण करण्यातही नारळीकर सर आणि त्यांच्या पिढीतील अन्य तज्ज्ञांचा मोलाचा सहभाग मान्य करावा लागेल. त्यांनी देशाला या क्षेत्राची विशेष ओळख करून दिलीच; खेरीज वैज्ञानिक विचार नवीन पिढीपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवले. भारताच्या उंचावलेल्या प्रतिमेमागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.


डॉ. जयंत नारळीकर यांनी विश्वउत्पत्तीशास्त्र आणि विश्वउत्क्रांती या विषयांमध्ये प्रचंड काम केले. या क्षेत्रातील त्यांचे योगदान वादातीत आहे. त्याचबरोबर ‌‘स्टेडी स्टेट थेअरी‌’वरही त्यांनी मोठे काम केले. या थेअरीने त्यांना जगभर ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मी ‌‘आयुका‌’मध्ये कार्यरत झालो तेव्हा ते निवृत्त झाले नव्हते. मात्र मी त्यांच्या विषयात काम करत नसल्यामुळे चर्चा करण्याची, एकत्र काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. मात्र माझ्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विलक्षण प्रभाव आहे, हे नाकारून चालणार नाही. कारकिर्दीत उत्तुंग उंची गाठूनही जमिनीलगत राहणारा माणूस असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या साध्या राहणीचे, प्रगाढ बुद्धिमत्तेचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत.


डॉ. नारळीकर यांची ओळखच इतकी मोठी होती की देशात कुठेही त्यांना सहज प्रवेश होता. मानाचे स्थान होते. पण वैयक्तिक पातळीवर त्यांनी या गोष्टीचा कधीच लाभ उठवला नाही. इतकेच काय पण, कोणी समोर आले तर नमस्कार करत ते अत्यंत मृदू भाषेत ‌‘मी जयंत नारळीकर‌’ अशी आपली ओळख सांगायचे. अपरिचित व्यक्तीशी याच वाक्यानिशी त्यांच्या संभाषणाची सुरुवात व्हायची. त्यांचे हे एक वाक्य समोरच्या कोणत्याही वयाच्या माणसाला आपलेसे करायचे. या वाक्याने त्याच्यावरील ताण नाहीसा व्हायचा आणि संवाद सहजी घडायचा. स्वभाव इतका सौम्य आणि सौहार्दपूर्ण असल्यामुळेच शाळकरी मुलेही त्यांच्याशी सहज बोलू शकायची. शंका विचारू शकायची. आजच्या भाषेत बोलायचे तर त्यांनी कधीच ॲटिट्युड दाखवला नाही. दांडगा जनसंपर्क असण्यामागील हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते. ते कोणत्याही विषयावर बोलायला तयार असायचे. विशेष म्हणजे प्रत्येक विषयात बोलण्यासाठी त्यांच्याकडे अनेक संदर्भ आणि महत्त्वपूर्ण मुद्दे असायचे. त्यामुळेच त्यांचे बोलणे अत्यंत प्रभावी व्हायचे.


आजही ‌‘आयुका‌’ ही संस्था जयंत नारळीकर या नावाच्या प्रभावाखाली आहे. त्यांनी तिथे संशोधनाला पुरक ठरणारे वातावरण तयार केले. याचा प्रभाव तेथे येणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाला जाणवतो. इतर विषयातही मोठे योगदान देणे, साहित्यनिर्मिती करून जनसामान्यांपर्यंत आपले विचार पोहोचवणे, देशाला वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेकडे नेणे हे कामही त्यांनी अत्यंत सहजतेने केले. खगोलशास्त्रातील त्यांचे योगदान याच्या पलीकडे आहेच, पण ‌‘आयुका‌’सारखी संस्था, वैज्ञानिकांची पुढील पिढी घडवण्याचे कामही आभाळाच्या उंचीचे आहे. त्यांनी हे काम केले नसते तर आज आपण वेगळ्या ठिकाणी असतो.


नारळीकर सरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. एखाद्या शास्त्रज्ञाने आपल्या क्षेत्राबरोबरच अन्य प्रांतातही इतके महत्त्वपूर्ण योगदान देण्याचीही कदाचित ही पहिली वेळ असेल. यामागेही भारतात होणारी वैज्ञानिक प्रगती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचाच विचार असावा. असा विचार करणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व आता हरपले आहे. नवीन पिढीने त्यांचा वारसा जपला तरच निर्माण झालेली ही पोकळी भरून येऊ शकते. नारळीकर सरांना विनम्र आदरांजली!


अशा या थोर शास्त्रज्ञाच्या निधनामुळे भारताने एक महान शास्त्रज्ञ गमावला आहे. डॉ. नारळीकर यांच्या कार्यामुळे भारतीय विज्ञानक्षेत्राला एक अमूल्य वारसा मिळाला. त्यांच्या योगदानामुळे अनेक पिढ्यांना विज्ञानाची गोडी लागली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. त्यामुळेच आता हा वारसा जतन करण्याची जबाबदारी नवीन पिढीवर आहे. त्यांच्या पत्नी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे २०२३ मध्ये निधन झाले. त्यांनीही गणिताच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आणि शालेय गणित अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनात सक्रिय सहभाग घेतला. हे दांपत्य ‌‘साधी राहणी, उच्च विचारसरणी‌’ या उक्तीचे मूर्तिमंत प्रतीक होते. दोघांनीही हयातभर अनेक उपक्रमांमध्ये नवी पिढी घडवण्यात, संस्कारित करण्यात, विज्ञान आणि गणिताची गोडी निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली. डॉ. नारळीकर यांच्या कार्यामुळे भारतीय विज्ञानक्षेत्राला एक वेगळी उंची मिळाली. अनेकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास त्यांच्या अव्याहत सुरू असणाऱ्या कामाचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही.


डॉ. नारळीकर यांची ओळखच इतकी मोठी होती की देशात कुठेही त्यांना सहज प्रवेश होता. मानाचे स्थान होते. पण वैयक्तिक पातळीवर त्यांनी या गोष्टीचा कधीच लाभ उठवला नाही. इतकेच काय पण, कोणी समोर आले तर नमस्कार करत ते अत्यंत मृदू भाषेत ‌‘मी जयंत नारळीकर‌’ अशी आपली ओळख सांगायचे.

Comments
Add Comment