
बावधन पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांची कसून चौकशी केली. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील कलमात वाढ करीत नीलेश चव्हाणलाही आरोपी करण्यात आले आहे. तसेच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील करण्यात आले आहेत.
वैष्णवीला लग्नात देण्यात आलेले ५१ तोळे सोन्याचे दागिने हगवणे कुटुंबाने बँकेकडे गहाण ठेवले आहेत. सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. याबाबत बँकेशी पत्रव्यवहार केला असून, गहाण ठेवलेले सोने हे हुंड्यातील असल्याचे कळविले आहे. हगवणे पिता-पुत्रांनी पसार असताना वापरलेल्या दोन लक्झरी कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीय गेले असता नीलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवला होता. या कृतीद्वारे त्याने बाळाच्या जीवाला धोका निर्माण केला म्हणून नीलेश विरोधात पोलिसांनी ‘मुलांची काळजी व संरक्षण’ या कलमाची वाढ करत गुन्हा नोंदवला आहे. नीलेशला पोलीस शोधत आहेत. याआधी वारजे पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये नीलेश विरोधात महिलेचे छुप्या कॅमेऱ्याने शूटिंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.