
टँकरची संख्या १५ टक्के कमी
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील पाण्याची मागणी तसेच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे.
शहरात मार्च तसेच एप्रिल या दोन महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती. महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत पाण्याची मागणी २५ टक्के वाढली होती. आता ही मागणी १५ टक्के कमी झाली आहे. पाण्याची मागणी कमी झाल्याने टँकरची संख्याही कमी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरातील टँकरची संख्या वाढली होती. नागरिकांकडून होणारी टँकरची मागणी लक्षात घेऊन टँकरचालक महापालिकेकडून पाणी घेऊन उपनगरांमधील सोसायट्यांना देत होते. मात्र, पावसामुळे यामध्येही घट झाली आहे. सद्य:स्थितीत टँकरच्या मागणीत १० टक्के घट झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढली होती. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. गेल्या आठवड्यापासून पाण्याच्या तक्रारींत घट झाली आहे. काही ठिकाणी टँकरची मागणीही कमी झाली आहे.
- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग