Sunday, May 25, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'मन की बात'मध्ये काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

'मन की बात'मध्ये काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमाच्या १२२ व्या भागात ऑपरेशन सिंदूरवर बोलले. देश दहशतवादाच्या विरोधात एकवटलेला दिसत आहे. प्रत्येकाचे मत आहे की, दहशतवादाचा बीमोड व्हावा. भारतीय सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ऑपरेशन सिंदूर हे बदलत्या भारताचे दर्शन घडवते. प्रत्येकातील देशभक्ती दिसत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती. तर ते आमच्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे; असेही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर आता अनेक भारतीयांचा जीवनाचा भाग बनले आहे. बिहारमधील कटीहार, उत्तर प्रदेशमधील कुशीनगर आणि इतर अनेक ठिकाणी जन्मलेल्या बाळांना सिंदूर हे नाव देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी सैनिकांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. यातून सैनिकांचे अतुलनीय शौर्य दिसून आले. यासाठी सैन्याने भारतीय शस्त्रे आणि स्वदेशी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरनंतर आता व्होकल फॉर लोकल ही संकल्पना अनेकांना प्रेरीत करत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करणे, भारतीय सेवांचा लाभ घेणे याचे प्रमाण वाढत आहे. सुटीत फिरण्यासाठी भारतातील पर्यटनस्थळांवर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक तरुण आता भारतातच डेस्टिनेशन वेडिंग करण्यास उत्सुक आहेत; असेही पंतप्रधान म्हणाले.

नक्षलवाद संपुष्टात येत आहे. नक्षलवाद्यांमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधांचाही अभाव होता आता तिकडे परिस्थिती बदलत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या काटेझारी गावात पहिल्यांदाच बस पोहोचली. गावातील लोकांनी ढोल वाजवून बसचे स्वागत केले. विकास होत आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील ६५ वर्षीय जीवन जोशी यांच्याबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, पोलिओमुळे जीवन जोशी यांचे पाय अधू झाले पण त्यांचे धैर्य खचले नाही. जोशी यांनी पाईन झाडापासून बॅगेट नावाची कलाकृती तयार केली. या कलाकृतीमुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून केले मनमाडच्या खेळाडूंचे कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२२ व्या 'मन की बात' कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी ते खेलो इंडिया या उपक्रमाबाबत बोलले. मनमाडमध्ये राहणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या साईराज राजेश परदेशी या खेळाडूचे त्यांनी कौतुक केले. परदेशीने बिहार येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या खेलो इंडिया IN यूथ गेम्समध्ये तीन नवे राष्ट्रीय विक्रम केले आहेत.

बिहारच्या पाच शहरांमध्ये खेलो इंडिया IN यूथ गेम्सच्या वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. देशातील पाच हजारांपेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. खेळाडूंनी बिहारच्या खिलाडू वृत्तीचे आणि बिहारच्या आत्मीयतेचे कौतुक केले. यंदा खेलो इंडियामध्ये २६ विक्रम झाले. भारोत्तोलन स्पर्धेत महाराष्ट्राची अस्मिता धोने, ओडिशाचा हर्षवर्धन साहू, उत्तर प्रदेशचा तुषार चौधरी यांच्या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले. अॅथलेटिक्समध्ये उत्तर प्रदेशच्या कादर खान आणि शेख जीशान, राजस्थानच्या हंसराजने उल्लेखनीय कामगिरी केली. बिहारने ३६ पदके जिंकली. जो खेळतो तोच प्रगती करतो. तरुण खेळाडूंसाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात. यातूनच खेळाडूंची प्रतिभा फुलत जाते. या स्पर्धांमधून भारतीय क्रीडा क्षेत्राचे उज्ज्वल भविष्य घडत आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
Comments
Add Comment