
अनघा निकम मगदूम
आपल्या आजूबाजूला आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली अनेक माणसं असतात, त्यातील अनेकजण आपली आदर्श असतात. आपणही असंच व्हावं असं आपल्याला वाटत असतं आणि आयुष्याची वाटचाल करताना असे आदर्श असतील तर तो मार्ग नक्कीच सोपा होऊन जातो, पण साधेपणातही किती गोडवा असतो, साधं राहूनही कसं स्वतःचं वलय निर्माण करता येतं आणि स्वतःमधलं असामान्यत्व सिद्ध करता येतं ते सौ. निलमताई नारायणराव राणे यांच्याकडे पाहिलं की समजतं.
कोकणची मुलगी, सासू, आजी या कौटुंबिक नात्यांसोबतच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे यांची पत्नी, कुडाळ-मालवणचे आमदार निलेशजी राणे आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे या दोन कर्तृत्ववान मुलांची आई, विविध व्यवसाय, उद्योग तितक्याच क्षमतेने सांभाळताना त्यालाही लोककल्याणाची जोड देणाऱ्या उद्योजिका आणि हे सगळं वलय आजूबाजूला असतानाही अत्यंत साधेपणाने वावरणाऱ्या सौ. निलम ताई राणे यांचं व्यक्तिमत्त्व आदर्शवत आहे. कुटुंब, व्यवसाय आणि समाजकारण आणि जोडीला असलेले राजकारण याची उत्तम सांगड कशी घालता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचं असणं इतकं प्रसन्न असतं की, त्यांच्या आजूबाजूचा परिसर तितकाच आनंदमय होऊन जातो. खरंतर निलम ताईंचा आजपर्यंतचा जीवन प्रवास नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे. आयुष्यातील अनेक चढ-उतार त्यांनी साहेबांसोबत पाहिले आहेत. त्या प्रत्येक परिस्थितीतही त्या एखाद्या नंदादीपासारख्या कायम तेवत राहिल्या आहेत.
असं म्हणतात, जो आव्हानांना तोंड देतो त्याच्यात इतिहास घडवण्याची क्षमता असते, राणे साहेबांचे व्यक्तिमत्त्व असेच आहे. थेट भिडणारे आणि अशक्यातून परिस्थिती बदलणारे! साहेबांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत गिरणी कामगाराच्या मुलापासून राज्याचा मुख्यमंत्री, देशाचं प्रतिनिधित्व करणारा केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार या प्रवासात अशा अनेक पदांवर काम केले आहे. यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचवेळी जी जी पदे मिळवली त्यातही विकासाची दृष्टी ठेवली, समाजाची जोड ठेवली आणि कोकणच्या मातीची नाळ जोडून ठेवली. या संपूर्ण प्रवासात साहेबांनी अनेक संकटांचा सामना केला. अनेक खडतर आव्हानं त्यांच्यासमोर आली. वाईट काळाचा सुद्धा त्यांनी सामना केला. अशावेळी साहेबांसोबत खंबीरपणे उभं राहून येणाऱ्या संकटांचा सामना करतानाच कुटुंबालाही निलमताई यांनी तितकेच बळ दिले आहे. काळ बदलत असतो यावर विश्वास ठेवत संपूर्ण राणे कुटुंबाने आपली समाजाशी, कोकणाशी, इथल्या मातीशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही आणि त्यामुळेच आता परिस्थिती बदलली आहे.
पण या सगळ्या चढ-उतारामध्ये, या संपूर्ण काळामध्ये प्रत्येक क्षणी राणे कुटुंबाची परीक्षा घेतली गेली. पण या परीक्षेचा सामना कसा करायचा हे जसं राणेसाहेबांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं, त्याचप्रमाणे ही परीक्षा देताना संयम कसा ठेवायचा, चांगलं घडेल यावर विश्वास कसा ठेवायचा हे निलम ताई यांनी शिकवलं. या कुटुंबाने बदलता काळ पाहिला, बदललेली माणसं बघितली, बदललेली परिस्थिती बघितली. असं असतानाही प्रत्येकजण बदलला सामोरा गेला, या मागे निलमताई यांचा असलेला विश्वास खूप महत्त्वाचा होता. कुटुंब हा आपला भक्कम पाया आहे हे त्यांना नक्की माहिती आहे आणि ते कुटुंब त्यांनी बांधून ठेवलं. या सगळ्या काळात निलम ताई राणे यांच्या चेहऱ्यावरील हास्य, आपुलकी कधीच मावळली नव्हती, प्रत्येकाबद्दलची आत्मीयता ढळली नव्हती हे विशेष!
पण कधी कधी प्रश्न पडतो हे सगळं निलम ताईंनी कसं निभावलं असेल? पण त्यानंतर एक गोष्ट आवर्जून जाणवते ती म्हणजे त्या कोकण कन्या आहेत. रत्नागिरीच्या माहेरवाशीण आणि सिंधुदुर्गच्या सासुरवाशीण आहेत.कोकणवासीयांच्या घरासमोरच प्रचंड समुद्र आणि पाठीशी भक्कम सह्याद्री उभा असतो. याच कोकण प्रदेशात त्या लहनाच्या मोठ्या झाल्या आहेत. येणाऱ्या कोणत्याही संकटांचा सामना करायचा असतो आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं हे प्रत्येक कोकणी माणसाला जन्मापासूनच माहिती आहे तसंच त्यांनाही माहिती आहे. निलम ताई यांनी माननीय साहेबांना साथ देतानाच आई म्हणून त्यांनी आपल्या दोन कर्तृत्ववान मुलांना उत्तम घडवलं आहे, आज त्या सासू आणि आजी तर आहेत पण त्याच वेळेला राणे साहेबांचा जो संपूर्ण महाराष्ट्रातला कार्यकर्त्यांच्या रूपाने असलेला परिवार आहे त्या प्रत्येकाला आईसाहेब म्हणून त्यांनी बांधून ठेवलंय.
त्यांना केव्हाही भेटलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर असणारं सुमधुर हास्य, डोळ्यांमधला आश्वासकपणा आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलताना मिळणारा आनंद हा निलम ताई यांच्या सहवासात आलं की नेहमीच जाणवतो. आज राजकारणातील मोठी पदे त्यांच्या घरात आहेत पण असं असंल तरी त्या नेहमीच अत्यंत साधेपणाने राहणाऱ्या, सगळ्यांनाच आपलंसं करणाऱ्या आहेत. आज निलम ताई नारायणराव राणे यांचा वाढदिवस. त्यांचं असणं हे नेहमीच प्रेरणादायी असतं, साध राहूनही किती मोठं होता येतं, साधेपणातच किती आनंद आहे आणि साधं राहण्यातच किती सोज्वळता आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ. निलमताई राणे आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्यासह त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो या सदिच्छांसह खूप खूप शुभेच्छा!