
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
मी विश्वकोशाची अध्यक्षा होते तेव्हाची गोष्ट. विश्वकोश पुरा करावा ही माझी इच्छा होती. महाराष्ट्र शासनाचे पूर्ण सहकार्य होते. कुठल्याही कामाची खोटी कुणीच करीत नव्हते. प्रत्यक्ष मा. विलासराव देशमुख, मा. अशोकराव चव्हाण माझी प्रत्येक मागणी पुरी करत असत. आणि मागून मागून मी मागणार काय? कागद, पुस्तके नि संदर्भग्रंथ. विश्वकोश हा संशोधनात्मक ग्रंथ असल्याने मला जे संशोधनात्मक साहित्य लागे त्याचा सरकारी कामाशी सुतराम संबंध नसल्याने मला ‘मोकळा हात’ याने की पूर्ण स्वातंत्र्य होते. पण महिन्यातील ९ दिवस मी वाईला वास्तव्य करीत असे. ९ चे कधी १२ दिवसही होत. पण माझे यजमान त्या बाबतीत सहिष्णू होते. मुलींची लग्ने झाली होती. मला नातवंडे झाली होती. संसार त्या अर्थाने आलबेल होता. तर वाईच्या मुक्कामातील ही गोष्ट. ऐका, वाचा, प्रिय वाचकांनो. वाईला मी ज्या गृहात राहत असे, तिथला गृहरक्षक मला पोळी भाजीचा डबा देत असे. साधे शाकाहारी जेवण खाण्यात असल्याने तशी विशेष पंचाईत नव्हती. तर एक दिवस एक साधेसे गृहस्थ माझ्या खोलीत आले. त्यांनी इच्छा व्यक्त केली, की त्यांना ही खोली हवी आहे. आता एक बाई त्या खोलीत राहत असताना तीच खोली मागणे हा गुन्हाच ना? त्यातून मी पडले विश्वकोशाची अध्यक्ष म्हणजे मानाची गोष्ट ! “ तुमची मी दुसरी सोय करून देतो बाईसाहेब !” “मला राग आला.” “अहो, मग तुम्ही जा ना त्या दुसऱ्या जागेत राहायला माझ्यावर का बळजबरी?” “काय आहे, वाईत आलो की मी याच खोलीत, याच कॉटवर झोपतो. माझा परिपाठ आहे.” “मग तो मोडा.” “का हो?” “कारण मी ही खोली वापरीत आहे. मी आधीपासून या खोलीत नसते, तर गेले असते दुसऱ्या खोलीत पण ‘आपकी मर्जी रखनेके लिये’ मै रूम छोडूंगी नहीं!” “गृहस्थ मुकाट बाहेर गेले.’’ थोड्या वेळाने गृहरक्षक आत आला. “ते बाहेर रुसून बसलेत.” त्याने मला सांगितले. “अरे वा ! लहान पोरगा आहेत का रूसून बसायला?” “तुम्हाला ठाऊक नाही. कोण आहेत ते?” “कोण आहेत?” “कोल्हापूरचे महाराज आहेत ते.” मी चकित झाले. “काय महाराज आहेत?” “हो. साधे राहतात म्हणून...” “अरे, महाराजांनी मुकूट नि उत्तरीय घालायचे दिवस आता गेले आता कोणत्या जमान्यात आहेत तू?” “ही सारी प्रॉपर्टी महाराजांची आहे मॅडम विश्वकोशाला दान दिलय महाराजांनी.” “हो का? मी महाराजांना ओळखले नाही. जाऊन त्यांची माफी मागते.’’ मी उठले. बाहेर गेले. “महाराज.” “काय?” “मला माफ करा. मी आपल्याला ओळखले नाही.” “हरकत नाही.” “मला खरोखर माफ करा.” “अहो, मला त्या खोलीशिवाय निद्रा येत नाही.” “मला कुठेही झोप येते.” “मग मी ती खोली वापरू.?” “अवश्य वापरा.” “सॉरी हं ! तुमची झोपमोड माझ्यामुळे झाली.” महाराज म्हणाले. “अहो, मीच तुमची माफी मागतो.’’ “तुम्हाला चांगली एसी रुम देतो. झोपा मस्तपैकी बाईसाहेब.” “महाराजांनी त्याची प्रशस्त एसी खोली मला देऊ केली. गृहरक्षकाने माझी गादी घातली. “झोपा बाईसाहेब शीत खोलीत.” “गृहरक्षक निघून गेला. मी आरामात झोपले. एसी खोलीत. असा हा मोठा माणूस ! साधासुधा. अजिबात मोठेपणा न मिरवणारा ! मी त्यांच्याकडून न बोलता वागण्याचे धडे घेतले.