Saturday, May 24, 2025

कोलाज

गणित विदूषी - डॉ. मंगला नारळीकर

गणित विदूषी - डॉ. मंगला नारळीकर

ओंजळ पल्लवी अष्टेकर


भारतातील STEM (Science, Technology, Engineering and Math) मधील शिक्षण भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारत जगात STEM पदवीधर निर्मितीमध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१६ मध्ये सुमारे २.६ दशलक्ष (२६ लाख) नवीन STEM पदवीधर तयार झाले. या मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळामुळे देशाने तांत्रिक क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी भरारी घेतली आहे. भारतातील महिलांचे STEM पदवीधरांमधील प्रमाण ४३ टक्के असून, हे जागतिक स्तरावर सर्वाधिक आहे. मात्र, याचा तितकासा प्रभाव रोजगाराच्या संधींवर दिसून येत नाही. महिलांचे STEM क्षेत्रातील रोजगारातील प्रमाण केवळ १४ टक्के आहे. संशोधन आणि विकास संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या २.८ लाख वैज्ञानिक आणि अभियंत्यांपैकी केवळ १४ टक्के महिला आहेत. ही असमतोल स्थिती सुशिक्षित महिलांच्या क्षमतेचा योग्य वापर होत नसल्याचे दर्शवते. त्यामुळे STEM क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे केवळ समानतेचा मुद्दा नसून, तो देशाच्या आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक आहे.
आपण आज एका प्रसिद्ध गणित-तज्ञांविषयी जाणून घेऊया. डॉ. मंगला नारळीकर यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी मुंबईत एका सुशिक्षित आणि प्रगत विचारसरणी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील विज्ञान क्षेत्रात कार्यरत होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या घरात शिक्षणाला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला मोठे महत्त्व दिले गेले. लहान वयातच त्यांना गणिताची गोडी लागली आणि त्यांनी या विषयात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला.


त्यांनी आपले शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आणि १९६२ साली गणित विषयात बी.ए. (Bachelor of Arts) पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी त्याच विद्यापीठातून १९६४ साली गणितात एम. ए. (Master of Arts) पदवी मिळवली आणि सर्वोच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या.
एम. ए. नंतर, डॉ. मंगला नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबईच्या गणित शाखेत संशोधन विद्यार्थी आणि संशोधन सहकारी म्हणून १९६४ ते १९६६ या कालावधीत कार्यरत होत्या. १९६६ मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी झाला आणि त्यानंतर त्या इंग्लंडच्या केंब्रिज येथे स्थलांतरित झाल्या.


१९६७ ते १९६९ या काळात त्या केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व विद्यार्थ्यांना (Under Graduate) गणित शिकवत होत्या. केंब्रिजमधील शिक्षण आणि अध्यापनानंतर, त्या भारतात परत आल्या आणि १९७४ ते १९८० या काळात पुन्हा TIFR मध्ये संशोधन कार्य केले.
कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत असताना, त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९८१ मध्ये गणित विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा (थीसिस) विषय विश्लेषणात्मक संख्या सिद्धांत (Analytic Number Theory) हा होता आणि त्यांनी डॉ. कनकनाहल्ली रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले.
त्यांनी संशोधन क्षेत्रात विविध गणितीय सिद्धांतांवर कार्य केले असून त्यांच्या संशोधनाने भारतीय गणित क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून दिले आहेत. त्यांचे कार्य प्रामुख्याने संख्याशास्त्र, बीजगणित आणि प्रमेय सिद्धांत यांसारख्या क्षेत्रांमध्ये आहे. त्यांच्या गणितीय संशोधनामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे आणि त्यांनी गणित शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. त्यांनी संख्याशास्त्रातील विविध प्रमेयांचा अभ्यास आणि संशोधन केले.


सिव्ह्ड संख्यांचे सिद्धांत,” आक्टा अरिथ्मेटिका, १९७८.
“एर्डॉस आणि सेमरेदी यांच्या एका प्रमेयावर,” हार्डी-रामानुजन जर्नल, १९८०.
“ हर्विट्झ झेटा फंक्शनच्या सरासरी वर्ग मूल्य प्रमेयावर,” इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या कार्यवाही, १९८१.
“एल-फंक्शन्सचे संकरित सरासरी मूल्य प्रमेय,” हार्डी-रामानुजन जर्नल, १९८६.
“केवळ अबेलियन गटांच्या क्रमांवर,” बुलेटिन ऑफ लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी, १९८८.


हे संशोधन गणितशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांनी गणितातील गुंतागुंतीच्या संकल्पनांचे नवीन पैलू उलगडले.
गणिताचा प्रसार आणि जनसामान्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे हे त्यांचे ध्येय राहिले होते. त्या गणित शिक्षणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली होती. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणित शिक्षण अधिक सुलभ आणि रुचकर करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले होते. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन केले, विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्याचे कार्य केले. त्यांची गणितविषयक अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये: ‘गणिताच्या सोप्या वाटा’ - हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केले.
‘मूलभूत गणिताची सोपी उपलब्धता ‘हे पुस्तक शाळकरी मुलांसाठी तयार केले.


‘अ काॅस्मिक अ‍ॅडव्हेंचर’ - हे प्राध्यापक जे. व्ही. नारळीकर यांच्या खगोलशास्त्रावरील पुस्तकाचे भाषांतर मंगलाताईंनी केले.
डॉ. मंगला नारळीकर आणि त्यांचे पती प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ - डाॅ. जयंत नारळीकर या दोघांनीही विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. त्यांच्या सहजीवनामुळे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या तीन कन्या देखील शिक्षण आणि विज्ञान क्षेत्राशी निगडित आहेत.
डॉ. मंगला नारळीकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गणित क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना भारत सरकार आणि शैक्षणिक संस्थांकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कार्यामुळे गणित क्षेत्रातील संशोधनाला आणि शिक्षणाला अधिक बळकटी मिळाली आहे.
त्यांचे मिळालेले पुरस्कार - ‘विश्वनाथ पार्वती गोखले पुरस्कार’- (२००२) हा पुरस्कार विद्यार्थ्यांसाठी गणित सुलभ आणि रोचक बनविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून देण्यात आला. तसेच डाॅ. मंगलाताईंना ‘डाॅ. एम. एस. गोसावी एक्सलंस पुरस्कार ’ - गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गणित क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन देण्यात आला.


डॉ. मंगला नारळीकर यांनी गणित क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अभ्यासामुळे आणि संशोधनामुळे अनेक नवोदित गणित तज्ञांना प्रेरणा मिळाली आहे. गणित शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यांची कार्यशैली आणि समर्पण भावी पिढ्यांसाठी एक आदर्श ठरते. गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्या एक आदर्श शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक म्हणून ओळखल्या जातात. डॉ. मंगला नारळीकर यांचे १७ जुलै २०२३ रोजी पुण्यात निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या आणि एक वर्ष कर्करोगाशी झुंज देत होत्या. आजारी असूनही, त्या नेहमी सकारात्मक राहिल्या आणि आपल्या पती डॉ. जयंत नारळीकर यांना शेवटच्या क्षणापर्यंत पाठिंबा देत राहिल्या. २० मे रोजी डॉ. जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतला.

Comments
Add Comment