
दी लेडी बॉस:अर्चना सोंडे
हे वर्ष २०२५ आहे. तीन वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी केली. १५ दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवून पाकिस्तानला धडा शिकवला. या मोहिमेची माहिती सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन भारतीय महिला सैन्याधिकारी पत्रकार परिषदेत देत. भारताच्या लेकी किती शक्तिशाली आहेत हे जगाने पाहिलं. धाडसी आणि शूरवीर अशा नवीन भारताचा जगभर डंका वाजत असताना १० महिन्यांच्या बाळाची आई हुंडाबळीची शिकार ठरली. वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. सारा देश हादरला. एकीकडे भारतमातेच्या लेकी जगाला धडकी भरवत आहेत आणि दुसरीकडे तिच्या लेकी हुंड्यासारख्या कुप्रथेला बळी पडत आहे. ४० वर्षांपूर्वी या कुप्रथेविरुद्ध अशाच अभागी मुलीची आई न्यायालयीन लढाई लढली. तिच्यामुळे हुंडाविरोधी कायदा निर्माण झाला. ही लढाऊ आई होती सत्यराणी चढ्ढा.
दिल्लीच्या लक्ष्मीबाई कॉलेजमधून पदवीधर झालेल्या शशिबालाचे सुभाष चंद्राशी लग्न झाले. तेव्हा शशिबाला अवघ्या २० वर्षांची होती. सुभाषचंद्र बुटासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाटा कंपनीचा व्यवस्थापक होता. लग्नाला अवघे १० महिने झाले होते. शशिबाला स्टोव्हचा भडका होऊन लागलेल्या आगीत भाजली आणि मरण पावली. विशेष बाब म्हणजे ती सहा महिन्यांची गर्भवती होती.
शशिबालाच्या सासरचे लोक स्कूटर, टेलिव्हिजन आणि रेफ्रिजरेटर इत्यादी अनेक गोष्टींची मागणी करत होते. सत्यराणीने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण ती तसे करू शकली नाही. तिने कसे तरी टीव्ही आणि रेफ्रिजरेटरसाठी पैसे जमा केले होते पण स्कूटरसाठी पैशांची व्यवस्था करू शकली नाही. तिच्या मुलीच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी जावई सुभाषचंद्र याने सत्यराणीला उर्वरित हुंड्याची (स्कूटर) मागणी पूर्ण न झाल्यास भयानक परिणाम होण्याची धमकी दिली.
शशिबालाने आपल्या अल्पायुषी अशा १० महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यात आपल्या आईला व माताराणीच्या (देवीच्या) नावे अनेक पत्रे लिहिली. त्यात ती आपल्या आईला एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न करत होती की सगळं काही ठीक होईल. तिला हुंड्यावरून जो सासरी जाच होत आहे तसा जाच सुभाषच्या बहिणींना होऊ नये अशी तिची इच्छा होती. हुंडा घेणे व देणे हा १९६० पासून कायदेशीर गुन्हा होता. मात्र हुंडा देणे व घेणे ही सामाजिक प्रथा होती, जी सर्वमान्य होती. आपल्या मुलाला रोख रक्कम, दागिने, गाडी, भांडी, कपडे काही वेळेस तर घर, जमीन हुंड्यात मिळाले असे अभिमानाने सांगितले जायचे. त्यावरून सामाजिक प्रतिष्ठा ठरत असे. इतके भयानक वास्तव त्या काळी होते.
मात्र या कुप्रथेविरुद्ध एक आई, आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी उभी राहिली. तिला खंबीर साथ मिळाली ती हुंड्यापायी बळी गेलेल्या मुलीची आई असलेल्या शाहजहान आपा यांची. ८०-९० च्या दशकात एका अहवालानुसार १९८७ मध्ये १९०० हुंडाबळी होते. हेच प्रमाण १९९७ मध्ये ६००० झाले. २०११मध्ये तर ८६०० महिला हुंडाबळी ठरल्या. हुंडाबळीच्या प्रमाणाचे एक प्रमुख कारण म्हणजे महिला आणि मुलींना ‘ओझे’, विशेषतः ‘आर्थिक ओझे’ म्हणून सतत पहिले गेले. मुलगी वयात आली की तिचं लग्न लावून देणं ही मोठीच जबाबदारी भारतातील पालकांना वाटते. या समस्येवर मात करण्यासाठी, वधूची ‘मालमत्ता’ घेण्यासाठी वराच्या कुटुंबाला रोख रक्कम, वस्तू किंवा ‘भेटवस्तू’ स्वरूपात हुंडा देण्याची प्रथा सुरू झाली. तथापि, पती आणि त्याचे कुटुंब लग्नानंतर पत्नी आणि तिच्या कुटुंबावर दबाव आणून आणि गैरवापर करून अधिक वस्तूंची मागणी करतात आणि जे त्यांच्या ‘मागण्या’ पूर्ण करण्यात अयशस्वी होतात त्यांना हिंसाचार आणि मृत्यूला सामोरे जावे लागते.
१९८० मध्ये सत्यराणीने सुभाष चंद्रा आणि त्याच्या कुटुंबावर कनिष्ठ न्यायालयात खून आणि हुंडाबळीचे आरोप दाखल केले. पोलिसांनी सुभाषचंद्रावर खुनाचा नाही तर हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप लावला. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १९८० मध्ये असा निर्णय दिला की चंद्राने स्कूटरची मागणी लग्नाच्या दहा महिन्यांनंतर केली होती, त्यामुळे त्याचा मृत्यूशी संबंध असू शकत नाही. सत्यराणी यांनी खुनाचा खटला सुरू ठेवला; परंतु न्यायालयात खटल्याची सुनावणी होण्यासाठी २००० पर्यंत वेळ लागला. २००० मध्ये सुभाषचंद्राला आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणाच्या आरोपात अखेर दोषी ठरवण्यात आले. अपीलवर, २०१३ मध्ये त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली आणि त्याला सात वर्षांची शिक्षा भोगण्याचा आदेश देण्यात आला.
१९८० च्या दशकात, जेव्हा हुंडाबळींच्या घटना वाढत होत्या, तेव्हा सत्य राणी चड्ढा यांनी रॅलींमध्ये भाग घेतला आणि या ‘प्रथे’चा अंत करण्यासाठी मोहीम राबवली. १९८७ मध्ये घरगुती आणि लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्यांसाठी शक्ती शालिनीची स्थापना झाली. हिंसाचारातून वाचलेल्यांना न्याय देण्यासाठी दोघांनीही अनेक कायदेशीर आणि सांस्कृतिक लढाया लढल्या. या लढ्याला कालांतराने यश आले.
यापूर्वी, कायद्यानुसार, हुंड्याची व्याख्या ‘लग्नासाठी विचार’ अशी केली जात होती. १९८३ च्या पहिल्या दुरुस्ती कायद्याने हुंड्याची व्याख्या बदलून लग्नादरम्यान कधीही ‘भेटवस्तू’ मागणे समाविष्ट केले. क्रूरतेशी संबंधित प्रकरणांना हाताळण्यासाठी भारतीय दंड संहितेत समाविष्ट केलेल्या फौजदारी कायद्यातील सुधारणा अमलात आणण्यात आली. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ११३ अ मधील दुसऱ्या दुरुस्ती कायद्यात असे म्हटले आहे की, जर विवाहित महिलेचा लग्नाच्या सात वर्षांच्या आत आत्महत्या करून मृत्यू झाला आणि तिच्या पती/सासऱ्यांनी तिला यापूर्वी कोणत्याही प्रकारची हिंसाचार आणि क्रूरता सहन केली असेल तर आत्महत्येस प्रवृत्त करणे गृहीत धरले जाते.
सत्यराणी आणि शाहजहान आपा यांच्या लढ्यामुळे अनेक सासुरवाशीण तरुणींना कायद्याचे संरक्षण मिळाले. दोघांनीही हुंडा वादात आपल्या मुली गमावल्या, त्यांनी न्यायासाठी आणि भारतातील हुंडा प्रथा बदलण्यासाठी दशके एकत्र काम केले. सत्यराणी चड्ढा या भारतातील हुंडाविरोधी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. अशी ही लढाऊ आई, सत्यराणी चढ्ढा १ जुलै २०१४ रोजी निधन पावली.भारतातील विवाहित महिलांसाठी त्यांनी अर्ध्याहून अधिक आयुष्य लढण्यात घालवले. त्यांच्यासाठी धैर्य आणि लढाऊ बाण्याचे प्रतीक म्हणून त्या नेहमीच लक्षात राहतील.