Saturday, May 24, 2025

कोलाज

श्रमप्रतिष्ठा...

श्रमप्रतिष्ठा...

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


श्रमजीवींचे श्रमसंस्कार, श्रमप्रतिष्ठा हे सारं शालेय नैतिक मूल्यांपैकी एक महत्त्वाचे मूल्य आहे. आठवते का मंडळी! शाळा ज्ञानमंदिर आहे. घर असो वा जीवन किंवा शाळा आपल्याला नैतिक मूल्यांपैकी श्रमप्रतिष्ठा या नैतिक मूल्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. “आळसे कार्यभाग नासे” असे म्हणतात. आळशी लोक सतत सबबी, कारणे सांगत असतात. आलेली संधी गमावतात. काम मग ते कोणतेही असो कामाची कसली आली आहे लाज? चांगल्या हेतूने केलेल्या त्या कामाचे सोने होते, संधीचेही सोने होते. निश्चितच!


अगदी शेतात राबणारे बळीराजा मंडळी कष्ट करून “भुकेला कोंडा निजेला धोंडा” असेच जगतो. राबता राबता थकून उद्याच्या आत्मिक, आर्थिक उद्धार, विकास, विस्तारासाठी झेपावतात. तो निरक्षर असला आणि साक्षर असला तरीही त्याला श्रमाचे महत्त्व ठाऊक असते. श्रम केल्याशिवाय कृतीशिवाय सारे व्यर्थच.


आपल्या अवतीभोवती कष्टकरी उंच उंच मनोरे रचणाऱ्या मजुरास पाहा. देशाच्या कानाकोपऱ्यातून शहरात पोटाची खळगी बुजवण्यासाठी आलेली ही मंडळी. मुंबापुरी म्हणजे झगमगती दुनिया. ही स्वप्न नगरी आणि आपल्या उराशी स्वप्न बाळगून कष्टकरी येतात. यांच्या स्वप्नात असतात आई-वडील, पत्नी, भावंड, संसार, लेकरं. यांच्या उदाहरणार्थ राबणारे हे हात आहेत. साठ साठ मजली उंच उंच मनोरे बांधता बांधता कधी तोल जाईल शाश्वती नाही. जीवावर बेतणारी काम करणारी, कष्टकरी हे महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र शासन आयोजित व्यसनमुक्ती आणि ताणतणाव शिबिरातून त्यांना मार्गदर्शन, समुपदेशन देण्याचा योग आला. जवळून त्यांना पाहिलं खूप मोठा वर्ग आहे हा. अस्थिर असे जीवन असते कोणती स्थिरता नाही. तरीही कष्ट करत असतात. गावाहून आलेला इस्त्रीवाला, पाणीपुरीवाला, भेळवाला, दूधवाला, इतकच काय भाजीवाला देखील आपण पाहतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून ही कष्टकरी मंडळी पोट भरण्यासाठी पोटाची खळगी बुजवण्यासाठी मिळेल ते काम करतात. कष्टाने, श्रमाने स्व सामर्थ्याने जगतात.


श्रमात लाज कसली? काम ते कामच ! कोणतेही असो. स्वच्छता कामगार म्हणजे सफाई कामगार देखील घर, रस्ते, कार्यालय, रुग्णालये, स्वच्छ ठेवतात. किती उदात्त आणि उदारमतवादी सेवाभावी वृत्ती असते. श्रमातून नंदनवन फुलवतात. कारण ते काम हे सेवेमध्ये आहे हे सेवेचे व्रत आहे, पण आपण त्यांना कचरेवाला म्हणतो. कचरा तर आपण करतो आणि इथे उचलतात ते कचरेवाला कसे? ते सफाईवाल्याने आपण केलेला सांडलेला कचरा उचलणारे कचरेवाले नाहीतच! खरं तर त्यांचा सन्मान करावा. आपल्या स्वत:च्या मुलांना आधी शिस्त लावली पाहिजे. कचरा हा टोपलीतच गेला पाहिजे. चॉकलेटचे कागद असतील, भेळचे कागद असतील किंवा जो काही कचरा आहे तो एका ठिकाणी साचवला पाहिजे. योग्य ठिकाणी टाकला जावा. रस्त्यावर केळीची सालं टाकणं त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा चालणाऱ्या लोकांना केळीच्या सालीवरून पडले तर! किती त्रास होईल? याची जाणीव करून देणे गरजेचे असते. आपण मात्र स्वयंशिस्तीने वागलं, तर मुलं देखील आपलं अनुकरण करतील. श्रमप्रतिष्ठा, श्रमजीवी लोकांसाठी असणारी श्रमाची पूजा आहे.


मी दोन जुळी मुलं पाहिली लहान लहान अगदी तीन वर्षांची. जरासं काही कळायला लागलं होतं, पण स्वतःच्या कपड्यांची घडी घालणं, स्वतःचं जेवण स्वतःच्या हाताने खाणं, मोठ्यांचं आदराने ऐकणं या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून आल्या. जसं आपण आपल्या मुलांना सुद्धा या गोष्टी सांगितल्या जाव्यात. वेळच्यावेळी त्याचं पालन होतेय का? हे पाहावे. लहानपणापासूनच लहान मुलांना संस्कार द्यावेत. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. शिष्य गुरूच्या घरी शिक्षणासाठी जात असत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद महनीय व्यक्ती सुद्धा आपल्या गुरुच्या घरी शिकले. ते शिक्षण घेताना सेवाभावी वृत्तीने पडेल ते काम करण्याची सुद्धा पद्धत होती.


संत महंतांच्या गोष्टींमध्ये जनी दळण कांढते. तर सावता माळी शेतात राबतोय. संत चोखोबा, गोरोबा, जगद्गुरु तुकोबा हे सुद्धा भक्ती आणि लेखन करूनही सेवा व कष्ट करत होते. कष्टकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे पावन भूमी आहे. पवित्र भूमी आहे संत, महंत, समाज सुधारक, प्रबोधनकार आणि रंजल्या गांजल्यांची ही महाराष्ट्र भूमी. येथे सर्वांनी सेवाव्रत घेतल्यामुळे संत गाडगेबाबा, रतन टाटा, मदर टेरेसा, बाबा आमटे, सिंधुताई सकपाळ या सर्वांना सेवाव्रती म्हणूनच ओळखलं जातं. या श्रमजीवींना, सेवाभावी व्यक्तींना श्रमप्रतिष्ठा, श्रमसाफल्य हीच आहे खरी जीवनाची गुरुकिल्ली.

Comments
Add Comment