Saturday, May 24, 2025

किलबिल

कुरडई

कुरडई

प्रतिभारंग:प्रा. प्रतिभा सराफ


आंब्याचा मौसम सुरू झाला. रत्नागिरीवरून खास मागवलेली आंब्याची पेटी उघडली आणि आंब्याच्या सुगंधाने अख्खे घर भरून गेले. आज पहिला रस करायला हरकत नाही, असा विचार मनात आला आणि मुलीला


आवाज दिला,


“राणी, मी आज आंब्याचा रस करणार आहे हं.” रविवारी सकाळी अर्धवट झोपेत डोळे किलकिले करत राणी म्हणाली,
“हो, पण आई, त्याच्याबरोबर ते गॅपगॅपवालं राउंड राउंड तळलेलं करतेस ना... ते पण
कर हं.”


“काय गं तुझी भाषा तरी, कमीत कमी मराठी पदार्थांची नावं तरी लक्षात ठेवत जा... त्याला ‘कुरडई’ म्हणतात. आता कमीत कमी आंब्याच्या मोसमात तरी लक्षात ठेव. नाहीतर पुढच्या वेळेस नाही बनवणार...”
मी चिडून म्हटले. ती पांघरूण बाजूला करून उठली आणि म्हणाली, “तुझं पण मराठी बरोबर नाही... ‘बनवणार नाही’ नाही काय, ‘तळणार नाही’ म्हण.”
आणि हसू लागली.


तिच्याशी गप्पा मारता मारता ‘कुरडई बनवणे’ म्हणजे काय ते आठवत गेले. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘कुरडई बनवणे’ हा फार मोठा उद्योग असायचा मुख्यत्वे माझ्या आईसाठी. चांगल्या प्रतीचे गहू आणणे, ते निवडणे त्यानंतर चार दिवस पाणी बदलत भिजवून ठेवणे. हे भिजलेले गहू वाटण्याचे एक यंत्र आमच्याकडे होते. ते लोखंडी यंत्र स्टूलच्या एका टोकाला स्क्रूने पक्के लावून घेऊन मग त्याच्यामध्ये ते भिजवलेले गहू टाकून हाताने दांडा फिरवून दळावे लागायचे, ते खूप मेहनतीचे काम असायचे. दळून झाल्यावर त्यात खूप सारे पाणी मिसळून ते गाळून घ्यावे लागायचे जेणेकरून गव्हाची फोलपटं चाळणीत वर राहायची आणि गव्हाचे ओले पीठ आणि पाणी खाली पडायचे. ते पाणी तसेच न हलवता अजून एक दिवस ठेवले की गव्हाचे ओले घट्ट पीठ खाली राहायचे आणि वर तरंगून आलेले पाणी फेकून ते ओले पीठ मोठ्या कढईत ठेवून हलवावे लागायचे ही क्रियासुद्धा खूप मेहनतीची होती कारण न थांबता ते हलवावे लागे. ते बऱ्यापैकी घट्ट होत आले की त्यात थोडेसे मीठ टाकून त्याचे गोळे करून सोऱ्याने प्लास्टिक कागदावर किंवा ताटल्यांमध्ये गोल गोल फिरवून सुबक अशा कुरडया घातल्या जायच्या.


राणी हे ऐकून हबकूनच गेली. म्हणाली,
“ तेव्हा दुकानात मिळत नव्हत्या का गं?”
“ नाही गं बाई... नाहीतर कशाला केला असता इतका खटाटोप?”


मग मी तिला आणखी एक दोन गोष्टी सांगितल्या. तेव्हा प्लास्टिक सहज उपलब्ध नव्हते; परंतु दूध प्लास्टिकच्या पिशव्यांमधून यायचे, त्या प्लास्टिकच्या पिशव्या धुऊन, वाळवून आणि मग एकत्रित शिवून एक प्लास्टिकची चादर तयार केली जायची. ते काम सुद्धा खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे होते. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या कामात जितकी होईल तितकी आम्हाला आईला मदत करावी लागायची. दिवसभर त्या वाळत घातलेल्या कुरडयांची राखण करावी लागायची.”
“बैल राखतात तसे का गं?”
“नाही गं बाई... कुत्रे, मांजरी किंवा एखादा उंदीरही तिथे येऊ शकतो, तोंड लावू शकतो म्हणून त्याच्या बाजूलाच बसावं लागायचं. कधीकधी आमच्या सोसायटीत राहणारी मुलंसुद्धा कुरडया पळवायचे.”
“म्हणजे चोरायचे?”
“ असं नाही म्हणता येणार; परंतु त्या ते उचलून खायचे.”
“कच्या”?
“ हो गं बाई. कच्चाचं. खूप छान लागतात. म्हणजे आमची आई जेव्हा चीक शिजवायची तेव्हा तो गरम गरम चीक आम्हा सगळ्यांना वाटीभरून खायला द्यायची. तो खूप चविष्ट लागायचा... होय आणि तो पौष्टिकही असतो.”
“वाव्... साउंड्स गुड. आजी सगळं करायची म्हणजे तुमची किती किती मजा. हे सगळं करणं-पाहणं-खाणं आम्ही मात्र मिस करतो. तू का नाही करत कुरडया घरी?”


“मी बाजारातून आणून तळते हेच खूप झालं गं बाई.” म्हणत मी तिथून उठले आणि आंब्याचा रस करायला घेतला.
आपल्यापेक्षा आपली मुले तितकीशी कामसू आणि उत्साही का नसतात याचे कारण कुठेतरी आपणच आहोत का, याचा विचार करू लागले. कारण गव्हाचा चीक असो, गुळातली जाड्या रव्याची लापशी असो, सांदण, डिंकाचे लाडू, मेथांबा, कडधान्यांचे थालीपीठ इ. पदार्थ आपणच करणे बंद केले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना या पदार्थांची चव माहीत नाही. त्याच्या फायद्यापासूनही ते मुकले आहेत. यापलीकडे जाऊन मला असे वाटते हे सगळे करण्याचा कौटुंबिक आनंद होता तोही दुरावला आहे.


विचारांच्या तंद्रीत स्वयंपाक झाल्यावर मुलीला आवाज दिला, “राणी या कुरडया जरा तळतेस का?”
“नको गं आई काम सांगूस. आज माझा रविवार आहे ना, आराम करण्याचा दिवस...”


आईचा आराम करण्याचा दिवस कोणता, या विचारात मी गॅसवर कढई चढवली आणि मुलीच्या आवडीच्या कुरडया तळायला घेतल्या.

Comments
Add Comment