Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये

शेतक-यांनी पेरणीची घाई करू नये

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार


मुंबई : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार २७ मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल.


मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान ५ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान ५ जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.



या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतक-यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतक-यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment