
लहानशा गोष्टी:शिल्पा अष्टमकर
वसभर खेळत राहणे चूक आहे. तसेच सतत आळशासारखे पडून राहणे हे देखील बरोबर नाही. आपण आपली दिनचर्या आखली पाहिजे, त्यासाठी आपण आपले वेळापत्रक तयार केले पाहिजे. दिवसातून किती तास खेळायचे, किती तास अभ्यास करायचा, दूरदर्शनवरील कोणती मालिका पाहायची आणि किती वेळ पाहायचे हे ठरवले पाहिजे. वेळेचे नियोजन केले म्हणजे जीवनात एक शिस्त येते.
समर्थ रामदास स्वामींचा वाचनावर
खूप भर होता.
दिसामाजी काही तरी ते लिहावे |
प्रसंगी अखंडित वाचीत जावे |
लेखन आणि वाचन हा विद्यार्थी जीवनाचा आत्मा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत अभ्यास करीत होते. एकदा ते दुपारी २ वाजता ग्रंथ वाचायला बसले. त्यांच्याकडे कामाला असलेला नोकर रामचंद सकाळी ९ वाजता येत असे आणि सायंकाळी ५ वाजता जात असे. तो ५ वाजता घरी जायला निघाला तेव्हा बाबासाहेब वाचण्यात गर्क होते. त्याने मी जाऊ का? म्हणून बाबासाहेबांना विचारले, बाबासाहेबांनी हाताने खूण करून त्याला जा म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामचंद कामावर आला. बाबासाहेब खुर्चीत बसून पुस्तक वाचत होते. रामचंदला वाटले की बहुतेक रात्री झोपून सकाळी पुन्हा वाचायला बसले असतील. आपण कामावर आलेले आहोत हे सांगण्यासाठी तो फक्त ‘बाबासाहेब’ म्हणाला तेव्हा काहीशा त्रासिकपणे बाबासाहेब त्याला म्हणाले “तुला जा म्हणून सांगितले ना?’’ मुलांनो दुपारी २ ते सकाळी ९ पर्यंत बाबासाहेब अभ्यास करत होते. सारे जग त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतात. रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून ते बॅरिस्टर झाले. जो वाचेल तो वाचेल, जो वाचणार नाही तो वाचणार नाही हाच नव्या युगाचा धर्म आहे. म्हणून समर्थांनी विद्यार्थ्यांना अफाट वाचन आणि थोडेसे लेखन रोज करायला सांगितले आहे. आपण जे वाचन करतो त्यातील आपल्याला आवडलेला आणि महत्त्वाचा वाटणारा भाग एखाद्या वहीमध्ये लिहून काढावा. निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन करताना अशी टिपणे उपयोगी पडतात.
आजच्या युगात तंत्रज्ञानाच्या झपाट्याने झालेल्या प्रगतीमुळे आपले जीवन अधिक सुलभ झाले आहे, पण त्याचवेळी वाचन आणि लेखन या मूलभूत सवयी मागे पडताना दिसत आहेत. त्याचाच परिणाम यंदाच्या १२ वीच्या निकालाच्या टक्केवारीवर दिसून आला. कोरोनात आपल्याला लिहिण्याची सवय पार कमी झाली. कळत नकळत हा परिणाम झाला. या सवयी केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी आवश्यक आहेत. कारण आज आपण लिहिणे कमी केले. त्यामुळे स्वतःला सादर करण्यास कमी पडतो. वाचन आणि लेखन या दोन क्रिया माणसाच्या बौद्धिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
वाचनाचे महत्त्व :
वाचन ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. चांगल्या पुस्तकांचा सहवास आपल्याला विचारसमृद्ध बनवतो. वाचनाने आपली शब्दसंपत्ती वाढते, भाषेचे सौंदर्य समजते आणि आत्मविश्वासही वाढतो. रोज काही वेळ तरी नित्य वाचन केल्याने मन:शांती मिळते, कल्पकतेला चालना मिळते आणि आपला दृष्टिकोन व्यापक होतो. अभ्यासाच्या पुस्तकांबरोबरच चरित्र, विज्ञान, तत्त्वज्ञान, कथा, कविता अशी विविध प्रकारची पुस्तके वाचणे उपयोगी ठरते.
लेखनाचे महत्त्व :
वाचनातून ज्ञान मिळते आणि लेखनातून ते आत्मसात होते. लिहिण्याची सवय मेंदूला कार्यरत ठेवते, विचारांची मांडणी स्पष्ट करते. रोज लेखन केल्याने विचारांची सुस्पष्टता येते, लेखन कौशल्य वाढते आणि भावनांची अभिव्यक्ती सुलभ होते. डायरी लिहिणे, लघुनिबंध, कविता किंवा विचार मांडणे - हे सर्व लेखनाचे प्रकार मनाला शांतता देतात आणि व्यक्तिमत्त्व घडवतात.
वाचन - लेखनाच्या नियमित सवयीसाठी काही मार्गदर्शक टिप्स :
१. नित्य ठरावीक वेळ ठरवा - दररोज कमीतकमी ३० मिनिटे वाचन आणि १५ मिनिटे लेखनाचा
सराव ठेवा.
२. विषयांची विविधता ठेवा - फक्त अभ्यासापुरते वाचन न करता विविध विषयांवरील वाचन करा.
३. डायरी किंवा विचार लिहा - दिवसाचे निरीक्षण, अनुभव, प्रेरणादायी विचार रोज लिहा.
४. नवीन शब्दांची यादी ठेवा - वाचनातून सापडलेले नवे शब्द लिहा आणि वापरण्याचा प्रयत्न करा.
५. साहित्यिक चर्चा करा - मित्रांशी वाचनानंतर चर्चा करा, त्यातून समज वाढते.
वाचन आणि लेखन या सवयी आत्मशोधाचा, आत्मविकासाचा आणि यशाचा मार्ग खुला करतात. या दोन सवयींचा रोजचा सराव म्हणजे आत्मा आणि विचारांना पोषण देणारा एक दिव्य योग आहे. त्यामुळे आजपासूनच ठरवा - “रोज वाचा, रोज लिहा - आणि स्वतःला घडवा.”