Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Vaishnavi Hagawane Case: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

Vaishnavi Hagawane Case:  रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (MSCW) अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांबाबत चाकणकर यांनी त्यांचे कर्तव्य बजावण्यात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वैष्णवीची जाऊ मयूरी जगतापने हगवणे कुटुंबाविरुद्ध केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणावरून राजीनाम्याची मागणी होत आहे.


पुणे पोलीस वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा तपास करत असून यातून इतर माहिती समोर येईल. मात्र महिला आयोगाने या प्रकरणी वेळीच लक्ष घातले नसल्याचा आरोप  विरोधक करत आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘चिल्लरचा आवाज खूप होतोय’, असे विधान केले होते. या विधानावर आता सर्वपक्षीय महिला नेत्या टीका करत आहेत.



महिला आयोग अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी


राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असलेल्या चाकणकर यांची अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना एमएससीडब्ल्यूच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, २०२४ मध्ये महायुती सरकारने सलग तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी चाकणकर यांची एमएससीडब्ल्यूच्या प्रमुखपदी पुन्हा नियुक्ती केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांना त्यांची दुसरी सून वैष्णवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर खडसे यांकडून मुख्यमंत्र्यांना हे पत्र आले आहे.


खडसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मयुरी जगतापवर हगवणे कुटुंबांनी केलेल्या हिंसाचाराबद्दल एमएससीडब्ल्यूच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करूनही एमएससीडब्ल्यूने कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. "आरोपी राजेंद्र हगवणे हा अजित दादा गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे, म्हणून त्याला वाचवण्यात आले आहे. जर एमएससीडब्ल्यूने मयुरीच्या बाबतीत कठोर कारवाई केली असती तर वैष्णवी आज जिवंत असती," असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.



 महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह


हगवणे यांनी केवळ वैष्णवी वर नव्हेच तर त्यांची थोरली सून मयुरी जगतापचा देखील छळ केल्याचा आरोप आहे. या संदर्भात मयूरीच्या आईने नोव्हेंबर २०२४ मध्ये एमएससीडब्ल्यूकडे तक्रार देखील दाखल केली होती. मात्र त्यासंदर्भात आयोगाने कुठलीच दखल घेतली नसल्या कारणामुळे, महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


मयुरी जगताप हगवणे ही वैष्णवीची मोठी जाव आणि तिचा दीर सुशील राजेंद्र हगवणेची पत्नी आहे, पोलिसांनी आतापर्यंत हगवणे कुटुंबातील पाच सदस्यांना अटक केली आहे. ज्यात वैष्णवीचा पती शशांक हगवणे सोबत, सासरे, सासू, मेहुणी आणि दीर यांचा समावेश आहे, ज्यात आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि हुंडाबळीप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.


रूपाली चाकणकर सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. यापूर्वी, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांच्याकडे हेच पद होते. खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आणि एमएससीडब्ल्यू अध्यक्षांच्या पक्षपातीपणाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. "आम्ही एमएससीडब्ल्यूच्या अध्यक्षपदी एका प्रॅक्टिसिंग महिला वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी करू," असे त्या म्हणाल्या.



चाकणकरविरोधात  ‘थील्लर पे चिल्लर’ आंदोलन


पुण्यात सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘थील्लर पे चिल्लर’ हे आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.


Comments
Add Comment