
पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा देण्याच्या आरोपाचे केलं खंडन
मुंबई: वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे तिने अनेकदा नाव बदलून यूपीएससीची परीक्षा दिली आहे. ज्यात 12 व्या यूपीएससी परीक्षेत तिला यश मिळाले. यापैकी नऊ वेळा तिने ‘पूजा दिलीपराव खेडकर’, तीन वेळा ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ असं नाव वापरल्याचा, तसेच वडिलांचं कधी ‘दिलीप’ तर कधी ‘दिलीपराव’ असं वेगवेगळं नाव वापरल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर तिने ओबीसी जातप्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा देखील आरोप होत आहे. यावर तिने पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली.
पूजा खेडकर ही माजी आयएएस प्रोबेशनर आहे, तिला गेल्या वर्षी बनावट कागदपत्रे आणि गैरवर्तनाच्या आरोपांनंतर सेवेतून काढून टाकण्यात आले होते. खरं तर, UPSC ने जुलै २०२४ मध्ये CSE २०२२ साठी खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती, कारण तिने परीक्षेत बसण्यासाठी निर्धारित केलेल्या जास्तीत जास्त प्रयत्नांपेक्षा अधिक वेळा म्हणजे तब्बल 12 वेळा परीक्षा दिली. यासाठी तिने स्वतःच्या आणि तिच्या पालकांच्या वेगवेगळ्या नावांनी अर्ज केला होता. या गोष्टीनंतर, डीओपीटीने तिला सेवेतून निलंबित केले. मात्र, पूजा खेडकरने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे.
पूजा खेडकरने केले आरोपाचे खंडन
पूजा खेडकरने तिच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले असून, (Pooja Khedkar refutes the allegations) आपली बाजू स्पष्ट केली आहे. “मी पहिल्यापासून पूजा खेडकर हेच नाव वापरलं आहे. यूपीएससी परीक्षा पहिल्यांदा दिली तेव्हा देखील मी हेच नाव वापरलं होतं आणि शेवटच्या वेळी देखील हेच वापरलं. दरम्यानच्या काळात मी फक्त एकच गोष्ट केली की मी माझ्या नावात माझ्या आईचं नाव समाविष्ट केलं. म्हणजे मी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव करून घेतलं. २०१४ मध्ये मी गॅझेट नोटिफिकेशनद्वारे कायदेशीररित्या हे नाव बदलून घेतलं. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देखील त्यांच्या नावात आईचे नाव लावतात मी कायदेशीररित्या ते नाव लावले आहे”. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पूजाने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा खेडकरने पुढे असे देखील सांगितले की, "मी सर्वांच्या माहितीसाठी सांगते, यूपीएससीच्या अर्जात आपल्या शालेय कागदपत्रांमध्ये जे नाव दिलेलं असतं तेच वापरावं लागतं. माझ्या शाळेच्या कागदपत्रांवर पूजा दिलीपराव खेडकर असं नाव लिहिलं होतं. त्यामुळे तेच नाव पुढेही कायम राहीलं. मात्र २०१४ मध्ये मी कायदेशीररित्या माझं नाव बदलून घेतलं."
यूपीएससीकडून आईचं नाव लावण्याची परवानी मिळाली : पूजा खेडकर
पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा देण्याच्या आरोपाचे खंडन करताना म्हंटले की, "२०१७ मध्ये यूपीएससीने मला कायदेशीररित्या बदललेलं नाव वापरण्याची परवानगी दिली. २०२१ नंतर मी माझ्या अर्जात आईचं नाव वापरलं. मी पुन्हा एकदा नमूद करते की मी माझं नाव कधीच बदललं नाही. मी केवळ प्रतिज्ञापत्र सादर करून माझ्या आईचं नाव समाविष्ट करण्याची परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर मी तीन वेळा परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी आईच्या नावासह माझं बदललेलं नाव वापरलं. तत्पूर्वी प्रत्येक वेळी मी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
पूजा खेडकर प्रकरणानंतर नागरी सेवा परीक्षांमध्ये बायोमेट्रिक अनिवार्य
पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आता नागरी सेवा परीक्षांमध्ये बायोमेट्रिक ओळख प्रणाली अनिवार्य करणार आहे. यासोबतच, यूपीएससी नागरी सेवा परीक्षांमध्ये AI चा देखील वापर होणार आहे. नागरी सेवा परीक्षांमध्ये होणारी फसवणूक आणि इतर अनियमितता रोखण्यासाठी यूपीएससीने ही नवीन प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, जी या वर्षापासून लागू केली जाईल. पूजा खेडकरचे प्रकरण समोर आल्यानंतर यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, यूपीएससी नागरी सेवा परीक्षांमध्ये बायोमेट्रिक आधारित ओळख प्रणाली लागू करणार आहे. या नवीन प्रणालीअंतर्गत, परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांच्या बोटांचे ठसे प्रमाणित केले जातील. यासोबतच, परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी चेहऱ्याची ओळख आणि ई-प्रवेशपत्राचे क्यूआर कोडसह स्कॅनिंग आणि एआय-आधारित सीसीटीव्ही पाळत ठेवणे आवश्यक आहे.