Sunday, May 25, 2025

महामुंबई

कंत्राटदारांना गाड्यांच्या फेऱ्यांवर नाही, तर कचऱ्याच्या वजनावर मिळणार पैसे

कंत्राटदारांना गाड्यांच्या फेऱ्यांवर नाही, तर कचऱ्याच्या वजनावर मिळणार पैसे

मुंबई महापालिकेची कचऱ्याची निविदा आता अंतिम टप्प्यात


मुंबई (खास प्रतिनिधी) :मुंबईतील कचरा वाहून नेण्यासाठी नव्याने कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या नवीन कंत्राट कामांमध्ये कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांनुसार पैसे दिले जात असे. परंतु आता नवीन कंत्राट कामांमध्ये वाहनांतून वाहून नेणाऱ्या कचऱ्याच्या वजनानुसारच पैसे अदा केले जाणार आहेत. त्यामुळे आजवर कचऱ्याच्या नावावर होणारी मोठी फसवणूक टाळता येणार आहे. शिवाय जेवढा कचरा उचलला जाईल तेवढेच पैसे दिले जाणार असल्याने महापालिकेचे संभाव्य नुकसान टाळून कचऱ्याचे अचूक वजनाची नोंद होईल.


मुंबईतील गोळा केलेल्या कचरा हा वाहनांमध्ये जमा करून त्याची विल्हेवाट देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यासाठी सन २०१८मध्ये नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेने यासाठी नव्याने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे.


यासाठी निविदा आता अंतिम टप्प्यात असून महापालिकेच्या एल विभाग, एम पूर्व विभाग, एम पश्चिम विभाग आदी वगळता उर्वरित विभागांमध्ये मनुष्यबळासह वाहनांची सेवा खासगी कंत्राटदारांकडून घेतली जाणार आहे. चार विभागांमध्ये वाहनांसह मनुष्यबळाचा पुरवठा हा कंत्राटदारांकडून केला जात असे तर उर्वरित विभागांमध्ये वाहनांची सुविधा कंत्राटदारांकडून घेऊन मनुष्यबळ महापालिकेचे असायचे.



महापालिकेची लुटमार आता थांबणार


जमा होणाऱ्या आणि डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे अचूक मापन केले जाणार असल्याने त्याची खरी आकडेवारी समोर येणार आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी गाड्यांच्या फेऱ्यानुसार दिले जाणारे पैसे बंद करून वजनाप्रमाणे पैसे देण्याचा निर्णय घेतल्याने एकप्रकारे कंत्राटदारांकडून महापालिकेची होणारी लुटमार थांबवण्यात मोठे यश येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment