Sunday, May 25, 2025

महाराष्ट्र

बोरी बुद्रुक वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करा

बोरी बुद्रुक वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश


पुणे : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, त्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे,’ असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.


महावितरणच्या मंचर विभागातील बोरी बुद्रुक येथे होणाऱ्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, तसेच सत्यशील शेरकर, सरपंच वनिता डेरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे उपस्थित होते.


जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक आणि परिसरातील गावे, वाड्या-वस्त्यांना महावितरणच्या शिरोली येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, शिरोलीचे उपकेंद्र अतिभारित होत असल्याने वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथे ‘कृषी धोरण २०२०’ या योजनेतून ९ कोटी ८६ लाख रुपये खर्च करून नवीन उपकेंद्र उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रातून ११ केव्हीच्या ६ वीजवाहिन्या निघणार आहेत. त्याद्वारे बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, कोरडेमळा, माळवाडी, साईनगर गावठाण, शिंदेमळा, बोरी खुर्द गावठाण, वसईमळा, तसेच वाड्या-वस्त्यांना सुरळीत वीज पुरवठा होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Comments
Add Comment