
नांदेड हे मराठवाड्याचं राजकीय केंद्र. राज्यातल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलूर, भोकर, मुखेड आणि नायगाव या सहाही जागांवर विजय मिळवला. यात भाजपाने चार, तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या संतुक हंबर्डे यांचा १४५७ मतांनी पराभव केला. त्यामुळे नांदेडमधील मतदारांचा 'स्प्लिट व्होटिंग'चा ट्रेंड समोर आला. मतदारांनी विधानसभेत महायुतीला आणि लोकसभेत काँग्रेसला पसंती दिली.
याच नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा शंखनाद होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची ही सभा म्हणजे भाजपाचं शक्तिप्रदर्शन असणार आहे. महायुतीने २०२४च्या विधानसभा निवडणुकीत २३० जागांसह प्रचंड विजय मिळवला होता.आता स्थानिक निवडणुकीतही विजयाची ही परंपरा कायम ठेवण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.यासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी नांदेड प्रतिष्ठेचं केलंय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा महायुतीचा विचार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच घोषित केलीय. मराठवाड्यातील मागासवर्गीय आणि ग्रामीण मतदारांना एकत्र आणणं हाही त्यामागचा एक उद्देश आहे. नांदेडमध्ये विशेषतः ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण पुन्हा लागू होणार असल्याने महायुतीला याचा फायदा होऊ शकतो.
भाजपाची रणनीती ही स्थानिक नेत्यांना संधी देत ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करण्याची आहे. मराठवाड्यातील दुष्काळ, शेती आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न यावर महायुती आक्रमकपणे बोलत आहे. अमित शहा यांच्या सभेतून विकास आणि स्थैर्य या मुद्द्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, महायुतीने एकनाथ शिंदे यांना प्रशासकीय कामात अधिक सामावून घेत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केलाय. त्यामुळे नांदेडसारख्या भागात शिवसेनेचे स्थानिक नेते पुढाकार घेऊ शकतात.
महायुतीने मराठवाड्यातील स्थानिक निवडणुकीत यश मिळवायचा चंग बांधलाय. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना बरोबर घेऊनच पुढे जावं लागेल. नांदेडमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा मोठा प्रभाव आहे. नांदेडमधील सभा ही एक प्रकारे महायुतीच्या एकजुटीचं प्रदर्शन ठरणार आहे. यात मतदारांचा मूड पाहूनच महायुतीला रणनीती ठरवावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार, लाडकी बहीण योजनेचा वापर योग्य प्रकारे करावा लागणार आहे. भाजपाला प्रत्येक मतदारसंघात रणनीती आखावी लागेल.
नांदेडमधील अमित शाह यांची सभा ही केवळ निवडणूक प्रचारापुरती मर्यादित नाही, तर ती महायुतीच्या एकजुटीचं आणि मराठवाड्यातील वर्चस्वाचं प्रदर्शन आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभेत दमदार कामगिरी केली, मात्र स्थानिक निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या आव्हानाला तोंड द्यावं लागेल.
दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांचा नांदेड आणि मराठवाड्यातील प्रभाव लक्षात घेता त्यांचा महायुतीला काय फायदा होतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषद, सोळा पंचायत समित्या, पंधरा नगर परिषदा, एक महापालिका आणि चार विधानसभा मतदारसंघांवर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचं वर्चस्व आहे. त्यामुळे नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये होणारा हा शंखनाद मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलणार का ? याचं उत्तर येत्या काही महिन्यांत मिळेल.