Sunday, May 25, 2025

विशेष लेख

वलयाच्या पलिकडे…...!

वलयाच्या पलिकडे…...!

संतोष वायंगणकर


कोणत्याही पुरुषाच्या कार्यकर्तृत्वामागे एक अदृश्य शक्ती वावरत असते. यशस्वीता घरातील कुटुंबप्रमुखाची दिसत असली तरीही त्यामागे निश्चितच कुटुंबसंस्थेचं व्यवस्थापन सांभाळणारी त्या घरची स्त्रीच असते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खा. नारायण राणे यांच्या पत्नी सौ. निलमवहिनी राणे यांचा आज वाढदिवस. दादांच्या चेंबूर ते कोकण व्हाया वर्षा, दिल्ली या सर्व प्रवासातील अगदी सर्व बाबतीत नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या सौ. निलमवहिनी म्हणजे दादांची सावलीच. एका वादळी व्यक्तिमत्त्वाबरोबर त्यांची साथ देत कुटुंबगाढा चालविणे तसं म्हटलं तर फार अवघडही; परंतु चेंबूरमधील दादांच्या आयकर विभागातील नोकरीचा काळ. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय सामान्य कुटुंबात हा अचानक घेतलेल्या निर्णयांने अनेक प्रश्न समोर होते. त्यावेळची ती चेंबूरमधील नगरसेवकपदाची निवडणूक, त्या निवडणुकीत त्यावेळच्या कार्यकर्त्यांसाठी रात्रभर जागून बनवलेली भाजी-पुरी आणि निवडणुकीत झालेला विजय. या सर्वांबद्दल कधीतरी सौ. निलमवहिनी भरभरून बोलतात. दादांमधला धाडसी स्वभाव आणि तत्काळ निर्णय क्षमता यामुळे एकाक्षणी जरी कसं होईल असं वाटलं तरीही त्या समस्येचं निराकरण झालेलं असायचं. दादांचं राजकारण, त्यांनी त्या-त्या परिस्थितीत घेतलेले निर्णय या सर्व निर्णयात सौ. निलमवहिनी नेहमीच त्यांची साथ करत राहिल्या. यामुळेच दादांनी उभ्या केलेल्या प्रकल्पांच्या, संस्थांच्या बाबतीतही हा सारा डोलारा फार न बोलता सौ. निलमवहिनी सांभाळत राहिल्या.

सिंधुदुर्ग शिक्षण विकास मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय अशा सर्व संस्थांचा कारभार स्वत: सौ. निलमवहिनी पाहतात. या पलीकडेही मुंबई, गोवा आदी भागातील संस्थाचं नीट-नेटकेपणाने काम चालणं हा त्यांचा कटाक्ष असतो. एकीकडे कुटुंबातील पती खा. नारायण राणे लोकसभा सदस्य, चिरंजीव निलेश राणे कुडाळ-मालवणचे आमदार आणि कणकवली-वैभववाडी-देवगड विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे जे महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत, अशा रितीने कुटुंबातील पती आणि मुलं राजकारणात व्यस्त असल्याने राणे परिवारात घरी येणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधणे, त्यांचं आदरातिथ्य अशा बारीक-सारीक गोष्टीत सौ. निलमवहिनींचे लक्ष असे. एखादा कार्यकर्ता, त्यांच्या परिवारातील कोणी आजारी असेल तरीही त्याची विचारपूस करणे, त्याला मदत करणे या सर्वांमध्यचे सौ. निलमवहिनी नेहमीच अग्रभागी असतात.

सौ. निलमवहिनी यांनाही मानणारा एक मोठा वर्ग आहे. सौ. वहिनींचं आपलेपणाने वागणं, बोलणं आणि जिव्हाळ्याचा संवाद यामुळे निश्चितच सौ. निलमवहिनी यांचाही राजकारणापलीकडे अनेकांशी स्नेह राहिला आहे. विशेषत: महिलांना एकत्र करून स्वयंरोजगार निर्मिती कशी करता येईल हा त्यांचा नेहमी प्रयत्न राहतो. कोकणात ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करणाऱ्या काबाडकष्ट करून पुढे जाणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. राणेंचं राजकारण जरी त्यांच्या-त्यांच्या पातळीवर होत असलं तरीही सौ. निलमवहिनींच समाजकारण, समाजोपयोगी काम त्यात त्या सतत व्यस्त असतात. दिल्ली-मुंबई-कोकण हा प्रवास करत सर्वांशी त्यांचा संवाद असतो. सौ. निलमवहिनींच्या वागण्या-बोलण्यात कोणताही श्रीमंती थाट नसतो. कोणताही बडेजाव नसतो. कणकवलीत ओम गणेशवर वास्तव्यास असताना नियमित मॉर्निंग वॉकला एकट्या जाणाऱ्या सौ. निलमवहिनींना पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं; परंतु मॉर्निंग वॉक हा त्यांचा नित्य नियम आहे. लक्ष्मीचा सहवास लाभलेल्या सौ. निलमवहिनी यांनी त्यांच्या स्वभावतला साधेपणा, संवेदनशीलता तसूभरही कधी कमी होऊ दिली नाही. खरंतर श्रीमंती आल्यावर, एखादी पोझिशन निर्माण झाल्यावर अनेकवेळा स्वभावगुण बदलतात; परंतु एक पत्रकार म्हणून आणि राणे परिवाराचा वेलविशर म्हणून गेली ३५ वर्षे या राणे परिवाराला फार जवळून पाहता, अनुभवता आले. यात सौ. निलमवहिनी यांचा स्वभाव पूर्वी होता तसाच आहे.

गेल्या ३९ वर्षांतील कोकणातील राजकारणाचे सारे चढ-उतार राणे परिवाराने पाहिले. २०१४ साल कटू आठवणींचं होतं. कुडाळ-मालवणमधील दादांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव सर्वांनाच धक्का देणारा होता; परंतु त्यावरही सौ. निलमवहिनी म्हणत असत. अहो, परमेश्वराने यांना (साहेबांना) खूप काही दिलं. जीवनात नेहमीच सगळंच चांगलचं कसं होतं राहील. एका पराभवाने माणसं समजली. आपली जीवाभावाची माणसं कोण, स्वार्थी कोण आहेत असं बरेच काही त्यामुळेच समजू शकलं. यामुळे मी परमेश्वराला कधीच ‘दूषण’ देणार नाही. इतक्या सकारात्मकतेने सौ. निलमवहिनी विचार करतात. सकारात्मक विचारामुळेच त्यांच्यातील एक यशस्वी सहचारिणी, कर्तबगार उद्योजिका आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सौ. निलमवहिनी या उत्तम ‘मॅनेजमेंट गुरू’ आहेत. सौ. निलमवहिनी यांचं कार्य, कर्तृत्व, त्यांची काम करण्याची कार्यपद्धती यावर त्या कधीही भाष्य करत नसल्या तरीही अनेक संस्थांचा डोलारा एकहाती सांभाळणाऱ्या सौ. निलमवहिनी यांच्या अंगीभूत असलेल्या व्यवस्थापकीय कर्तृत्वाची साक्ष देणार आहे. २० मे रोजीच दादा आणि सौ. निलमवहिनी यांचा विवाह वाढदिवस झाला. कोकणच्या या लक्ष्मी-नारायणांना श्रीदेव रामेश्वराने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो!

 
Comments
Add Comment