
रमेश तांबे
अरे आनंद उठ! किती वाजलेत बघ? आईची हाक कानी येताच आनंदने दोन्ही हाताने आपले कान दाबून धरले आणि तसाच झोपून राहिला. पुढे अर्धा तास तरी तो लोळतच होता. हाका मारून आई कंटाळली होती.
असे रोजच घडत होते. मग शाळेला उशीर झाला म्हणून घाईघाईने सगळ्या गोष्टी आवरायच्या. घरभर पसारा करायचा. पुस्तके, पेन, पेन्सिली, कपडे कुठेही टाकायचा, शाळेचे बूट-मौजे शोधताना तर त्याची रोज धांदल उडायची. आपल्या वस्तू ठरावीक ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, म्हणजे त्या शोधण्यात आपला वेळ जाणार नाही की साधी गोष्ट त्याला समजत नव्हती. आई, बाबा, आजी घरातले सगळेजण आनंंदच्या या वागण्याला फार कंटाळले होते. आनंदने घरात पसारा करून ठेवायचा आणि बाकीच्यांनी तो आवरायचा हे रोजच घडायचे. पण आनंदच्या स्वभावात, वागणुकीत काहीच बदल होत नव्हता.
आनंदला कामाची सवय कशी लावावी याचा विचार आई-बाबा करत बसले होते. अचानक बाबांना एक गोष्ट सुचली. त्यांनी पटकन आनंदच्या आईला काही गोष्टी समजावल्या आणि ते ऑफिसला निघून गेले. पुढचे दोन चार दिवस आनंद नेहमीप्रमाणे घरातला नीटनेटकेपणा बिघडवून आपल्या वह्या, पुस्तके, कपडे इकडे तिकडे फेकून शाळेत जायचा. तो घरी यायचा तेव्हा नेहमीप्रमाणे आईने घर आवरून ठेवलेले त्याला दिसायचे. त्यामुळे आपण काही चूक करतोय असे त्याला अजिबात वाटत नव्हते. मग तो दिवस उजाडला. बाबांनी त्या दिवसाचे काटेकोर नियोजन केले. आई-आजीला विश्वासात घेतले अन् बाबा ऑफिसला निघून गेले. तिकडे आनंद नेहमीप्रमाणे घरभर पसारा करून शाळेत गेला. शाळा सुटण्याच्या वेळेला कुलकर्णी सरांनी आनंदला बोलावून घेतले आणि म्हणाले, “आनंद आम्ही सर्व शिक्षक आज तुझ्या आजीला भेटायला घरी येणार आहोत. आत्ताच तुझ्या आजीची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून आम्ही त्यांचा सत्कारही करणार आहोत.” आनंदला अतिशय आनंद झाला. तो खुशीतच सरांना म्हणाला, “नक्की सर! आमचे घर तुम्हाला आवडेल आणि आजीलाही खूप आनंद होईल.” शाळा सुटल्यावर आनंद आपल्या शिक्षकांसह घरी आला.
आनंदने घराची बेल वाजवली. आईने दरवाजा उघडला आणि मोठ्या आनंदाने म्हणाला, “आई आमचे सर्व शिक्षक आले आहेत आजीला भेटायला! त्यांना काहीतरी छान नाष्टा बनव.” पण आनंदच्या लक्षात आले, अरेच्चा! आपण सकाळी फेकलेल्या चपला, बूट, मौजे तसेच बाहेर पडले आहेत. “आई हे काय सर आले आहेत ना! मग घर आवर ना पटापट” आनंद जरा घुश्यातच बोलला. पण आई काही न बोलता स्वयंपाक घरात निघून गेली. सर्व शिक्षक घरात शिरले. घराच्या दरवाजात चपलांचा ढीग त्यांनी पाहिला. तो ओलांडून सारे जण आत आले, बसले आणि आनंदचे घर बघू लागले. मग आजी आली. आनंदने आजीला सर्व शिक्षकांची ओळख करून दिली. आईने मुद्दामहून सर्व शिक्षकांना आनंदची खोली दाखवली. खोली बघताच आनंद शरमला. कारण सकाळी टाकून दिलेले कपडे, वह्या-पुस्तके, पेन-पेन्सिली तशाच पडल्या होत्या. आनंद पुढे येऊन त्या पटापट उचलू लागला.
तेवढ्यात कुलकर्णी सर म्हणाले, “अरे आनंद राहू दे. आम्हाला बघू दे तरी तू तुझे घर किती छान ठेवतोस ते!” आता मान खाली घालून उभे राहण्याशिवाय आनंदला पर्याय नव्हता. तेवढ्यात पाटील बाई म्हणाल्या, “आहो आमचा नातू चार वर्षांचाच आहे. पण त्याच्या सर्व वस्तू तो स्वतःच त्याच्या कपाटात ठेवतो. त्याला आपल्या वस्तूंना कुणी हात लावलेलं जराही चालत नाही.” पाटीलबाईंचा एक एक शब्द आनंदला भाल्यासारखा टोचून रक्तबंबाळ करीत होता. सर्व शिक्षक कधी एकदा बाहेर जातात असे त्याला झाले होते.
हा प्रसंग घडून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तेव्हापासून आनंदमध्ये खूपच बदल झाला आहे. वेळेच्या आधी उठून आपली सर्व कामे तो आता स्वतःच पूर्ण करू लागला आहे. सर्व घर नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. आनंदचे आई-बाबा मात्र आनंदवर खूपच खूश आहेत. जे काम आईला अनेक वर्षे करता येत नव्हते ते बाबांनी चुटकीसरशी सोडवले होते. पण शिक्षकांना घरी बोलवण्याच्या मागे बाबांचा हात होता ही गोष्ट मात्र आनंदला कधीच कळली नाही!