Saturday, October 25, 2025
Happy Diwali

रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर १ जूनपासून कारवाई

रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर १ जूनपासून कारवाई

मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची फेब्रुवारी २०२५ मध्ये दरवाढ करण्यात आली. त्यानुसार रिक्षा आणि टॅक्सीचे अनुक्रमे २६ आणि ३१ रुपये भाडे आकारण्यात येत आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली. नवीन दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे; परंतु, मुंबईतील सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३१ मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मान्यता दिली. यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये झाले. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत दरपत्रकानुसार भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुमारे ४.६२ लाखांहून अधिक रिक्षा आणि टॅक्सी असून यापैकी सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन अद्याप झालेले नाही.

Comments
Add Comment