Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

मे महिन्यात पडला १२ दिवसांत २१४ मिमी पाऊस!

मे महिन्यात पडला १२ दिवसांत २१४ मिमी पाऊस!

शहरातील रस्त्यावर वाहिले पाटासारखे पावसाचे पाणी


कर्जत : कर्जत तालुक्यास शनिवारी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. तालुक्यातील राशीन भाग सोडता इतरत्र दिवसभर पावसाने दमदार हजेरी दिली. मे महिन्याच्या उन्हाळ्यात प्रथमताच कर्जत शहरात शेतातील पाटासारखे पाणी रस्त्यावर वाहताना दिसले. अनेक सखल भागात जलाशयाचे स्वरूप पहावयास मिळाले.


शनिवारी कर्जत तालुक्यातील कोंभळी मंडळ क्षेत्रात सर्वाधिक ८० मिमी पाऊस पडला तर राशीन भागात अवघा ११.५ मिमी पावसाची नोंद झाली. १२ दिवसांत कर्जत तालुक्यास सरासरी २१४ मिमी पावसाची नोंद आहे. रविवारी देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मे महिन्यात दररोज अवकाळी पावसाची दमदार हजेरी पहावयास मिळत आहे. अवकाळी पाऊस की मान्सून हा कर्जतकराना प्रश्न पडला आहे.


१४ मे नंतर कर्जत तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार बरसला. शनिवार, दि २४ रोजी सकाळी काही अंशी उघडीप दिसली. मात्र दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. कर्जत तालुक्यात शनिवारी १० मंडळ क्षेत्रात सरासरी ५३ मिमी पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस कोंभळी मंडळ क्षेत्रात तब्बल ८०.३ मिमी पडला. त्या पाठोपाठ भांबोरा ७८ मिमी, खेड ६३, मिरजगाव ५२, कर्जत, कुळधरण आणि वालवड प्रत्येकी ५०.५ मिमी, कोरेगाव ५० मिमी तर सर्वात कमी राशीन मंडळ क्षेत्रात अवघा ११.५ मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्यात कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाचा हा उच्चांक असून १२ दिवसात एकूण २१४ मिमी पावसाची नोंद कृषी विभागाकडे आहे. संततधार आणि जोरदार पावसाने खरीप हंगाम शेतजमीन पेरणीपूर्व मशागतीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाली आहे. अनेक भागात शेतात पाणी मुरल्याने चिखलसदृश्य परिस्थिती दिसत आहे.


मे महिन्याच्या १२ दिवसांत २१४ मिमी पावसाची नोंद


कर्जत तालुक्यातील १० मंडळ क्षेत्रात सरासरी २१४ मिमी पावसाची नोंद असून यात सर्वाधिक अवकाळी पाऊस २८० मिमी भांबोरा भागात पडला आहे. तर सर्वात कमी १२८ मिमी पाऊस कुळधरण मंडळ क्षेत्रात झाला. मंडळ निहाय एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : कर्जत - २०८, राशीन - १५५, भांबोरा - २८०, कोंभळी - २७५, मिरजगाव - २०९, माही - २७५, कुळधरण - १२८, वालवड - २०८, खेड - २४७ आणि कोरेगाव १५७ मिमी पावसाची नोंद आहे.


तालुक्यात ७४ हजार ७५० हेक्टर खरीप पेरणी हंगामाचे उद्दिष्ट : शीतल पाचारणे


यंदा मे महिन्यातच जोरदार अवकाळी पावसाने हजेरी दिली. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या लागवडीसाठी आतुर झाला आहे. यंदा कर्जत कृषी विभागाचे खरीप हंगाम लक्ष्यांक ७४ हजार ७५० हेक्टर क्षेत्र असून यात मका २२ हजार, उडीद २४ हजार, तूर १८ हजार, बाजरी १ हजार ५४२, सोयाबीन ९०५ आणि कापूस २८२ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच खरीप पेरणीचे नियोजन करावे अशी माहिती कर्जतच्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी शीतल पाचारणे यांनी दिली.

Comments
Add Comment