
अकोले:तालुक्यातील पठार भागातील बेलापूर परिसरातील एका मेंढपाळाच्या मेंढ्यावर बछड्यासह तीन बिबट्यांनी हल्ला करून १४ मेंढ्या ठार केल्या. बेलापूर परिसरातील काठडी मळ्यात ही घटना घडली. मेंढ्यावर हल्लाबोल करताना भेदरलेल्या मेंढ्यानी आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून गेले. नंतर बिबट्यांनी भक्ष्य सोडून जंगलाकडे धूम ठोकली. मात्र एका बिबट्याने या जमावाला न जुमानता एक साक्ज आपल्या जबड्यात पकडून सोबत नेलेच. बेलापूर गावात मेंढपाळ संतोष मोहन बरकडे (रा. चोंबूत ता. पारनेर) हे वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय सांभाळत काठडी मळ्यात तात्पुरते वास्तव्यास आहेत.
बेलापूर गावच्या परिसरात संतोष बरकडे हे कुटुंबासह मेंढ्या चारण्याचे काम करतात. मेंढपाळ बरकडे यांनी बेलापूर परिसरातून मेंढ्या चारून सायंकाळी विश्रांतीसाठी काठडी मळ्यातील शेतकऱ्यांच्या खासगी क्षेत्रांत आपल्या मेंढ्याचा वाडा टाकला. त्यांनी मेंढ्यांना वाघूरी लावले व कुटुंबासमवेत जेवण करत होते. यापूर्वदिखील बिबट्याने या मेंढपाळच्या मेंढ्यावर १५ दिवसांपूर्वी हल्ला केला होता. या हल्ल्यात बिबट्याने एक मेंढी ठार केली होती. आता पुनः रात्री ११ च्या सुमारास बिबट्यांनी मेढ्यावर हल्लाबोल केला. यावेळी दोन बिबटे व एक बछडा एकत्रित सोबत होते. बरकडे यांनी नेहमीप्रमाणेच वाघुर लावली होती, पण शिकारीत तरबेज बिबट्यांनी वाघुर खालून मेंढ्यांच्या कळपात प्रवेश केला. वाघुरात अडकलेल्या मेंढ्यांवर बछड्यासह तिन्ही बिबट्यांनी ताव मारायला सुरुवात केली.
दरम्यान, मेंढ्याचे ओरडण्याचा आवाज ऐकून बरकडे कुटुंबाला जाग आली. मात्र, समोर बछड्यासह दोन भले मोठे बिबटे पाहून तेही घाबरले. त्यांच्यासोबत लहान मुले असल्याने संपूर्ण कुटुंबच समोरचा अनाकलनीय प्रकार पाहून भयभीत झाले. प्रसंगावधान राखून त्यांनीही मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर लोक धावून आले. जमावाला पाहून बछड्यासह बिबट्यांनी तेथून धूम ठोकली. मात्र, एकाने जाताना मेंढी जबड्यात पकडून डोंगराच्या दिशेने जंगलात नेली. बिबट्यांनी १४ मेंढ्या ठार केल्या, वनरक्षक दीपक शिंदे, वनमजूर अशोक उघडे, नितीन वारे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. ठार झालेल्या मेढ्याचे पंचनामे करून
अहवाल पाठविला.