Saturday, May 24, 2025

देशताज्या घडामोडीविडिओ

Muhammad Yunus : मुहम्मद युनूस राजीनामा देणार की लोकशाही स्थापणार ?

Muhammad Yunus : मुहम्मद युनूस राजीनामा देणार की लोकशाही स्थापणार ?

बांगलादेशाची अस्थिरता, भारताची भूमिका


बांगलादेशात मोठ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी होत आहेत. राजकीय अस्थिरता, सामाजिक असंतोष, राजकीय नेत्यांच्या भूमिका यामुळे गेला महिनाभर बांगलादेश भरडला जातोय. त्यातच आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. तर चला जाणून घेऊ या लेखातून बांगलादेशाचा हालहवाल...



बांगलादेशात हिंसाचार उसळला आणि त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ला राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतलाय. त्यातच आता बांगलादेच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या सध्याच्या परिस्थितीत काम करू शकणार नाहीत अशी भीती व्यक्त केलीय. त्यामुळे आधीच राजकीय, सामाजिक परिस्थिती गुरफटलेला बांगालदेश फुफाट्यात सापडलाय. बांगलादेशातील हिंसाचारानंतरही राजकीय पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची एकी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस राजकीय आणि सामाजिक तणाव वाढतोय. एकीकडे मुहम्मद युनूस राजीनाम्याची तयारी करत आहेत तर दुसरीकडे युनूस यांनी देशाच्या सुरक्षेसाठी, भविष्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्व सहकार्य केलं जाईल, अशी भूमिका राजकीय नेते मांडत आहेत.


काही दिवसांपासून युनूस यांच्या सरकारसमोर अनेक आव्हानं होती. त्यापैकी प्रमुख आव्हान म्हणजे बांगलादेशचं लष्कर. कारण या लष्कराने गेल्या वर्षीच्या झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावात महत्त्वाची भूमिका बजावली होती. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार पडल्यानंतर युनूस यांच्या हाती सत्ता सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी लष्कराने आंदोलकांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले. मात्र बांगलादेशच्या लष्कराने या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. बांगलादेशातील हिंसाचाराचे, राजकीय अस्थिरतेचे सामाजिक परिणाम दिसू लागले. धार्मिक अल्पसंख्याक, विशेषतः ख्रिश्चन समुदाय हा वाढत्या हिंसाचाराचा बळी ठरत आहे. राजकीय अस्थिरतेमुळे त्यांच्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. तर दुसरीकडे कट्टरपंथी इस्लामी गटांचा प्रभावही वाढतोय. जमात-ए-इस्लामीसारखे गट पुन्हा सक्रिय झाले आहेत. या गटांच्या वाढत्या प्रभावामुळे सीमेवरील असुरक्षितता आणि भारताबाबत विरोध वाढतोय. अवामी लीगवर बंदी घालण्यात आलीय आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सध्या निष्क्रिय आहे. ज्यामुळे राजकीय अराजक निर्माण झालंय.



भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध हे हसीना यांच्या काळात मजबूत होते, मात्र सध्याच्या सरकारच्या काही धोरणांमुळे आणि भारतविरोधी वक्तव्यांमुळे हे संबंध ताणले गेले आहेत. विशेषत: बांगलादेशातील घुसखोरी आणि सीमेवरील असुरक्षिततेच्या मुद्द्यांमुळे भारताने चिंता व्यक्त केलीय. युनूस यांच्या सरकारने चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलाय. याचा परिणाम म्हणजे भारतापुढे आव्हानं वाढलीत. बांगलादेशातील लष्कराला अधिक स्वायत्तता देण्यात आलीय. लष्कराला सूट मिळाल्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. त्यातच बांगलादेशवर आर्थिक संकट घोंगावत आहे. शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशाने निर्यातीवर आधारित औद्योगिकीकरणामुळे आर्थिक प्रगती साधली होती. मात्र सत्ता बदलानंतर देश आर्थिक संकटात सापडलाय. वाढती बेरोजगारी, उच्च चलनवाढ आणि जीडीपी वाढीचा दर कमी झालाय. सर्वसामान्य आणि तरुणांमध्ये संतापाची लाट आहे. बांगलादेशी घुसखोरी हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय आहे.


बांगलादेशातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे अनेक नागरिक भारतात स्थलांतर करत आहेत. याचाही भारत-बांगलादेश संबंधांवरही परिणाम झालाय. भारताने अलीकडेच बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमुळे बांगलादेशचं जवळपास ७७० दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालंय. भारताने तयार कपडे, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ, प्लास्टिक आणि पीव्हीसी उत्पादनं आणि लाकडी फर्निचरवही निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात बांगलादेश एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे. अंतरिम सरकारसमोर लोकशाहीची पुनर्स्थापना, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आव्हान आहे. कट्टरपंथी गटांचा वाढता प्रभाव आणि लष्कराची वाढती भूमिका यामुळे देश पुन्हा अस्थिरतेच्या दिशेने जाऊ शकतो.


बांगलादेशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अनेक आव्हानांनी भरलेली आहे. शेख हसेना यांच्या पतनानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेने देशाला नव्या राजकीय आणि सामाजिक संकटात ढकललंय आर्थिक प्रगती असूनही कट्टरपंथी गटांचा उदय, तरुणांचा असंतोष आणि सीमावाद यामुळे बांगलादेशासमोर अनेक प्रश्न निर्माण आवाचून उभे आहेत. भविष्यात लोकशाही मूल्यांचे संरक्षण, सामाजिक एकता आणि आर्थिक स्थैर्य यावर बांगलादेशचं भवितव्य अवलंबून आहे.

Comments
Add Comment