
शंतनू चिंचाळकर
विराटच्या निवृत्तीमुळे भारताने एक गुणी, तडाखेबाज, आक्रमक पण वेळप्रसंगी तितक्याच संयमाने निर्णय घेणाऱ्या क्रिकेटपटूला कसोटी क्रिकेटमधून निरोप दिला. रोहितपाठोपाठ त्याने घेतलेला निर्णय धक्कादायक असला तरी रोज नवनवीन उत्तमोत्तम युवा खेळाडू पुढे येत असताना वेळीच निवृत्ती जाहीर करून नव्या रक्ताला वाव देणे विराटने कधीही देशहिताचे मानले असेल. त्याच्या झगमगत्या कारकिर्दीचा वेध...
एकीकडे भारत - पाकिस्तानमध्ये निर्माण होत असलेल्या वाढत्या तणावाचे धक्के सहन करत असतानाच, क्रिकेटच्या विश्वामध्ये हिटमॅन म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भारताच्या महान फलंदाजाने, रोहित शर्माने २० ओव्हर्सच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांपाठोपाठ कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करून क्रिकेटरसिकांना धक्का दिला. या घटनेला आठवडाही होत नाही तोवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येणारा दुसरा धडाकेबाज फलंदाज, महान खेळाडू विराट कोहली यानेही कसोटी क्रिकेटला जय महाराष्ट्र केला. त्यानेही यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी-२० संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. हे दोघेही कसोटी संघातून निवृत्त होणार असले तरी वनडे क्रिकेटमध्ये मात्र खेळणार आहेत.
क्रिकेट हा भारतातील क्रीडारसिकांचा सर्वात आवडता आणि लोकप्रिय खेळ आहे. भारताला कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या कैक महान आणि गुणी खेळाडूंची परंपरा आहे. त्यातील कर्णधार आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या अजित वाडेकर, सुनील गावसकर, सौरभ गांगुली आणि अझरुद्दीन यांचा विशेष उल्लेख करता येईल. त्यांच्या वैयक्तिक आणि सांघिक खेळावर आजवर भारताने कैक कसोटीच नव्हे तर मालिका विजयही संपादन केले. पण तो काळ वेगळा होता. क्रिकेट म्हटले की शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालीयन वयाच्या आसपासचे तरुण त्यात रस बाळगून होते. पण आज दुसरी-तिसरीतल्या शालेय मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्व स्तरातून क्रिकेटची आवड निर्माण होऊ लागली आहे. म्हणूनच इतर कोणत्याही खेळाडूंच्या कसोटी क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीची बातमी मनाला क्लेश देऊन गेली नसेल एवढी लागोपाठ येऊन धडकलेल्या रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहलीच्या निवृत्तीची बातमी चटका देऊन गेली. आज पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट सामने म्हटले तरी ५० षटकांच्या एकदिवसीय किंवा ट्वेन्टी - ट्वेंटी सामन्यासारख्या धडाकेबाज आणि तितक्याच सातत्यपूर्ण खेळाची अपेक्षा चाहत्यांकडून केली जाते. खरे तर या दोन्ही महान खेळाडूंच्या खेळातील सातत्य, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षणातील चपळता या गुणांचा विचार केला तर रोहितचे ३८ आणि विराटचे ३६ ही तशी निवृत्ती घ्यायची वये नव्हेत, असे क्रिकेटमधील कोणीही दर्दी जाणकार म्हणेल. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी पार पाडत आहात, तिथे वय ही गोष्ट दुय्यम राहते. आणखी दोन-तीन वर्षे तरी त्यांनी कसोटी खेळणे चालू ठेवायला हवे होते, असे मत चाहतावर्ग सोशल मीडियावरून मांडत आहे. रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीचा विचार केला तर २०१३ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये ११६ डावांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४,३०१ धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर २१२ धावा आहे. तर कर्णधार म्हणून रोहितने २४ कसोटी सामन्यांमध्ये ३०.५८ च्या सरासरीने १,२५४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७२.५ टक्के विजयदरासह कर्णधारपदाच्या खुर्चीच्या सर्वोच्च स्थानावर होता.
रोहित आणि विराटच्या या निर्णयांमुळे त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला. प्रत्येक खेळाडूचे आपले असे वैशिष्ट्य असते. त्यामुळे रोहितपेक्षा विशेषकरून विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेटरसिकांना धक्का देऊन गेली. स्लीप आणि कव्हर पॉइंट या आवडत्या क्षेत्ररक्षणाच्या जागांवर त्याने टिपलेले अप्रतिम आणि अशक्यप्राय झेल पाहीले तर तो केवळ एक महान फलंदाजच नव्हे तर चपळ क्षेत्ररक्षकही आहे याबद्दल दुमत असायचे कारण नाही. भारताकडून १८ वर्षांखालील संघाचे केवळ सदस्यत्वच नव्हे तर, कर्णधारपद भूषवणाऱ्या विराटने २० जून २०११ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ सामन्यांमध्ये २१० डावांमध्ये ९२३० धावा केल्या आहेत. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत. तो १४ वेळा नाबाद राहिला असून १०२७ चौकार आणि ३० षटकार मारले आहेत. नाबाद २१४ ही विराटची सर्वोच्च धावसंख्या राहिली असून त्याने सात द्विशतके झळकावली आहेत. आपल्या कारकिर्दीचा शेवट त्याने वैयक्तिक दहा हजार धावा पूर्ण झाल्यावर करायला हवा होता, असे त्याचे चाहते नक्की म्हणत असतील. पण क्रिकेटची पंढरी असलेल्या भारतात रोज नवनवीन तरुण उदयन्मुख खेळाडू पुढे येत असताना वेळीच आपली निवृत्ती जाहीर करून त्यांच्यापैकी एकाला संधी देणे विराटने देशहिताचे मानले असेल.
क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना विराटचे आपल्या खेळाद्वारे केवळ वैयक्तिक कामगिरीच नव्हे तर, आपल्या संघातील सहकाऱ्यांची कामगिरीही कशी चमकेल यावर लक्ष केंद्रित केले. फलंदाजाच्या जवळ थांबून, कॉमेंट्स करून आपल्या संघातील गोलंदाजांचे लक्ष विचलित करणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघातील क्षेत्ररक्षकांना त्यांच्याच भाषेत उत्तरे देणारा विराट प्रेक्षकांशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हास्यविनोद करताना दिसणारा विराट, एखादा अप्रतिम झेल घेतल्यावर दर्शक स्टँडमध्ये बसलेल्या आपल्या पत्नीला किमान टाळ्या वाजव म्हणून खाणाखुणा करणारा विराट (!) आता फक्त एकदिवसीय आणि आयपीएल सामन्यांमधूनच दिसेल.
आणखी काही दिवस कसोटी सामने खेळून विराटला काही विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी होती. त्याने नेतृत्व केलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची संधी त्याला होती. सचिन तेंडुलकरने ७२ कसोटी सामन्यांच्या ११३ डावांमध्ये ५९४६ धावा केल्या. विराटने आतापर्यंत ४७४६ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला १२०१ धावांची गरज होती. त्याच्या इंग्लंड दौऱ्यावर न जाण्याने त्याचा इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम होणार नाही. विराट कोहलीने इंग्लंडमध्ये १७ टेस्ट सामन्यांमध्ये ३३ च्या सरासरीने १०९६ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर करण्याची संधी होती. सचिन तेंडुलकरने ३० डावांमध्ये ५४ च्या सरासरीने १५७५ धावा केल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचा विक्रम म्हणजे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या ९२३० धावा असून इंग्लंडवत्रुद्धची मालिका खेळली असती तर त्याला दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी होती. भारताकडून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनाच ही कामगिरी करता आली आहे. विराट कोहली या विक्रमापासून दूर राहिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने ४० सामन्यांमध्ये २७१६ धावा केल्या आहेत. रोहितने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहली ४६ सामन्यांमध्ये २६१७ धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट या विक्रमापासूनही दूर राहिला. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जून २०२५ मध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिप २०२७ साठी हा दौरा दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अशा महत्वाच्या दौऱ्यात रोहित, विराटसारख्या गुणी खेळाडूंची उणीव भारतीय संघाला नक्की जाणवेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला यश मिळाले असले तरी, बीसीसीआय त्याच्या वाढत्या वयामुळे नवीन नेतृत्व शोधत होते. त्याच्यानंतर ज्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली असती तो विराटही आता संघात नसल्याने एका धडाकेबाज पण संयमी सलामीवीर फलंदाजांची उणीव भारतीय संघाला जाणवू शकते. रोहित शर्मानंतर कसोटी संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह किंवा हार्दिक पंड्याकडे जाण्याची शक्यता आहे, पण विराटइतके नेतृत्वगुण आणि तत्पर निर्णयक्षमता या दोघांपैकी कुणाकडेही नाही. म्हणूनच जून २०२५ च्या येत्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळी भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे.