
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर, देहूरोड, तळेगाव व मावळमधील अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी केले.
मावळ तालुक्यातील सर्वात मोठे पवना हे धरण असून पिंपरी-चिंचवड शहराला मोठ्या प्रमाणात याच धरणामधून पाणी घेतले जाते. पिंपरी- चिंचवड शहरांसह महाराष्ट्रभर सध्या अवकाळी पावसाचा जोर आहे. मात्र हा पाऊस कायमचा राहत नसून केव्हाही बंद होऊ शकतो असे जाणकार सांगत आहेत.
पवना धरणामध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला ३१ जुलैपर्यंत पुरु शकतो आणि सध्या असलेल्या अवकाळी पावसाचा भरवसा नसल्याने शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून मावळमध्ये पडलेल्या पावसामुळे पवना धरणामध्ये किती पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असे विचारले असता सह शहर अभियंता सूर्यवंशी म्हणाले की " सध्या सर्वत्र पावसाचा जोर असला तरी धरणामध्ये पाणी वाढण्यासाठी सुरुवातीचे पंधरा दिवस लागतात. धरण परिसरातील छोटे मोठे खड्डे भरण्यास वेळ लागतो आणि ते सर्व खड्डे भरल्यानंतर धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी आवश्यक तेवढे वापरावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.