
मयूरी कापडणे
मयूरी कापडणे या अभिनेत्रीचा ‘अष्टपदी’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्या चित्रपटामध्ये ती एका वेगळ्याच भूमिकेत आहे.
मयूरीचा जन्म पुण्याचा. व्ही.आय.पी. स्कूलमध्ये (विश्वकर्मा विद्यालय) तिचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले. शिवाजी नगरच्या मॉडर्न कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. शाळेत असताना गायन, नृत्यामध्ये तिने भाग घेतला होता. आंतरशालेय गायन स्पर्धेमध्ये देखील तिने भाग घेतला होता. तिने भरतनाट्यम पूर्ण केलेलं आहे. ‘मी
सुद्धा एक दिवस टीव्हीवर दिसणार, मी मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये काम करणार, माझे देखील पोस्टर लागणार ‘असे ती आईला लहानपणी सांगायची. आई तिला लहानपणी नृत्य शिकण्यासाठी घेऊन जायची.
सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये तिने भरपूर संघर्ष केला. जमेल त्या ठिकाणी ऑडिशन दिल्या. अशातच तिला ‘डोम ‘हा चित्रपट मिळाला. त्याच दरम्यान तिला ‘माझा होशील ना’ ही मालिका मिळाली. ही तिची पहिली मालिका होती. त्यानंतर सरस्वती, घाडगे आणि सून, छत्रीवाली या मालिकेमधून तिने कामे केली. ‘तेरी लाडली मैं’ ही तिची पहिली हिंदी मालिका स्टार भारत वाहिनीवर होती. ही मालिका प्रचंड गाजली. त्यामध्ये एका मुक्या मुलीची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. तिने साकारलेली या मालिकेतील बिटी प्रेक्षकांची सहानुभूती मिळवून गेली. या मालिकेच्या दरम्यान तिला उत्तर प्रदेशामधून एका मुक्या मुलीचा व्हॉट्सअॅपवर कॉल आला होता. तिने हातवारे करून
सांकेतिक भाषेतून तिच्याशी तिच्या भावना व्यक्त केल्या. चाहत्यांचे हे प्रेम तिला सुखावून गेल. ती मालिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर जाऊ नको दूर बाबा, उदे गं अंबे या मालिका तिने केल्या. फिरस्त्या, प्रेमवाली, बोनसाय हे चित्रपट तिने केले.
आता तिचा ‘अष्टपदी’ हा नवीन चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये ती सावली नावाची व्यक्तिरेखा साकारीत आहे. ती श्रीमंत असते, तिच्या आई-वडिलांनी तिला कोणत्याही गोष्टीची कमी केलेली नसते. तिच्या वडिलांनी तिला सांगून ठेवलेले असते की, जीवनात तिला जे पाहिजे ते ती करू शकते, परंतु जीवनाच्या एका क्षणी तिला वडिलांचा बिझनेस सांभाळावा लागेल. ती तिचे शिक्षण पूर्ण करते, परंतु तिच्या जीवनाकडून काही अपेक्षा असतात, त्या तिला पूर्ण करायच्या असतात. तिला गायनाची आवड असते. ती गायनाला जाते, तिथे ती नायकाच्या प्रेमात पडते.
आतापर्यंत आपण सप्तपदी ऐकलेले आहे. लग्नात नवरा-बायको एकमेकांस सात वचन देतात. अष्टपदी म्हणजे नवरा-बायकोनी एकमेकांस आठवे वचन द्यायचे की ते एकमेकांच्या करिअरमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. एकमेकांना त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या चित्रपटामध्ये अभिनेते संतोष जुवेकरकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडून तिला काम करण्याचे स्वातंत्र मिळाले. या चित्रपटाचे बहुतेक शूटिंग कोल्हापूरमध्ये झालेले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवीन विषय प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.