Saturday, October 4, 2025

शुभमन गिल भारताचा ३७ कसोटी कर्णधार, देशाचा पाचवा तरुण कर्णधार

शुभमन गिल भारताचा ३७ कसोटी कर्णधार, देशाचा पाचवा तरुण कर्णधार
मुंबई : कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असलेला भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अठरा क्रिकेटपटूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलची कसोटी संघासाठी कर्णधारपदी निवड झाली आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघाकडून खेळतील. करुण नायर, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. पण मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही. फेब्रुवारी २०२२ पासून भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मासोबत विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनीही कसोटीला निरोप दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीने रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदी नियुक्ती करत भारतीय क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात केली आहे. शुभमन गिल २५ वर्षे आणि २५८ दिवसांचा आहे. तो कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. याआधी मन्सूर अली खान पतौडी (२१ वर्षे, ७७ दिवस), सचिन तेंडुलकर (२३ वर्षे, १६९ दिवस), कपिल देव (२४ वर्षे, ४८ दिवस) आणि रवी शास्त्री (२५ वर्षे, २२९ दिवस) यांनी लहान वयात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. मन्सूर अली खान पतौडी हा भारताचा र्वात लहान वयाचा कसोटी कर्णधार आहे. अद्याप त्याचा विक्रम कोणी मोडलेला नाही. शुभमन गिलने पाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याने निवडक एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. या व्यतिरिक्त तो गुजरात टायटन्स या आयपीएल संघाचे नेतृत्व करत आहे. तो भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार आहे. भारताचे कसोटी संघांचे आतापर्यंतचे कर्णधार सी. के. नायडू विजयनगरम के महाराजकुमार इफ्तिखार अली खान पतौडी लाला अमरनाथ विजय हजारे विनू मंकड गुलाम अहमद पॉली उम्रीगर हेमू अधिकारी दत्ता गायकवाड पंकज रॉय गुलाबराय रामचंद नरी काँट्रॅक्टर एम के पतौडी चंदू बोर्डे अजित वाडेकर एस वेंकटराघवन सुनिल गावस्कर बिशन सिंह बेदी गुंडप्पा विश्वनाथ कपिल देव दिलीप वेंगसरकर रवी शास्त्री कृष्णमाचारी श्रीकांत मोहम्मद अझरुद्दीन सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल द्रविड वीरेंद्र सेहवाग अनिल कुंबळे एम. एम. धोनी विराट कोहली अजिंक्य रहाणे के. एल. राहुल रोहित शर्मा जसप्रीत बुमराह शुभमन गिल (कसोटी कर्णधारपदी २४ मे २०२५ रोजी निवड)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा