
गडावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई
पुणे : सिंहगडावर जूनपासून प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला तसे आदेश दिले आहेत. याबाबत पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक झाली तेव्हापासून प्लास्टिकबंदी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बंदी लागू करण्यापूर्वी तयारी करणे आवश्यक असल्याने आम्ही थोडा वेळ मागितला होता. याबाबत १८ मे रोजी विक्रेत्यांची बैठक घेऊन समिती स्थापन केली. गडावर प्लॅस्टिक कचरा टाकला, तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
वन विभागाने काही वर्षांपूर्वी प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली होती. पर्यटकांच्या सामानाची तपासणीही सुरू झाली होती. विक्रेत्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने ही बंदी कागदावरच राहिली. यावेळी विक्रेत्यांची समिती नेमल्याने बंदीच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणात सिंहगड किल्ला वगळता जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता सिंहगडावरील बेकायदा बांधकामांच्या मालकांना नोटिसाही बजावण्यात येणार आहे. गडावर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सजवळ पाण्याची टाकी बसवण्यात येणार असून, त्यासाठीच्या परवानग्या मिळाल्या आहेत. टाकी बसविल्यानंतर किल्ल्यावर पिण्याचे पाणी नळाने पुरवू, असेही पवार म्हणाले.