
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 'गट-क' आणि 'गट - ड' मध्ये ३० संवर्गातील ६६८ पदांसाठी सरळसेवेव्दारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. २८ मार्च रोजी पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच १९ मे पर्यंत तब्बल ८४,७७४ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
प्राप्त अर्जांमध्ये सर्वाधिक २३३४७ अर्ज हे लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या १३५ जागांसाठी प्राप्त झाले असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) संवर्गाच्या ५१ जागांसाठी १५,४४७ तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या ८३ जागांसाठी १४५५८ आणि स्टाफ नर्स / मिडवाईफ (G.N.M.) संवर्गाच्या १३१ पदांसाठी १२,६३४ अर्ज प्राप्त झालेले आहेत.
अर्ज दाखल करणा-या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रिया संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in याला भेट द्यावी तसेच महानगरपालिकेचे अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मिडीया अकाऊंटला भेट द्यावी आणि सत्य व प्रमाणित माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे याविषयी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला बळी पडू नये अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.