Saturday, May 24, 2025

नाशिक

आडवण, पारदेवी भूसंपादनाविरोधात अर्धनग्न मोर्चा

आडवण, पारदेवी भूसंपादनाविरोधात अर्धनग्न मोर्चा

इगतपुरी : औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील मौजे आडवण व पारदेवी येथील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा शुक्रवार दि. २३ रोजी रवाना झाला. माजी आमदार पांडुरंग गांगड व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आडवण ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी अर्धनग्न मोर्चा महामार्गावरून नाशिकला निघाला.


न्याय नाही दिला तर हाच अर्धनग्न मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल असा इशारा गांगड व गुंजाळ यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी दिला. वडीलोपार्जीत शेत जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. शासनाने इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प आणुन शेतकऱ्यांना भूमीहीन करण्याचे काम केले आहे. या आधीच अनेक प्रकल्प तालुक्यात असतांना शासन पुन्हा औद्योगिक वसाहतीचा घाट घालत आहे. जर शेतकरी भुमीहीन झाला तर नागरिक काय कंपन्या खातील का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तालुक्यात रेल्वे, मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग, अनेक धरणे, डिझेल पेट्रोल लाईन, राष्ट्रीय महामार्ग यासाठी जवळपास शासनाने ८० टक्के जमीनी संपादीत केल्या आहेत. आता तरी शेतकऱ्यांना भूमीहीन करू नका. शेतकरी आता आक्रमक झाले असून आता जमीनींची मोजणी करू नये यासाठी आता शेतकरी एकवटले आहेत.


आमच्या जमीनीच्या ७/१२ वर घेतलेल्या नोंदी रद्द करून कमी करण्यात याव्यात यासाठी तहसील कार्यालयात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी यावेळी केली. बळजबरीने जमिनी संपादीत करण्याचा घाट घातला तर येथील शेतकरी सामुहीक आत्महत्या करतील असा इशारा गाव बचाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे व उपाध्यक्ष विष्णु कोकणे यांनी दिला. भर उन्हात निघालेल्या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात तुकाराम बाबा, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, पंढरीनाथ शेलार, रामा कोकणे, रोहीदास शेलार, सुरेश कोकणे, नितीन पुंदे, रमेश कोकणे, मधुकर गुंजाळ, काळु रेरे, विसराम शेलार, रामदास रेरे, पप्पु कोकणे, दत्तु कोकणे, तुकाराम कोकणे, रमेश कोकणे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Comments
Add Comment