
कृषी विभागाची खते, बियाण्यांवर करडी नजर
पालघर : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषि निविष्ठा (बियाणे, खते, कीटकनाशके) उपलब्ध व्हावीत, तसेच बियाणे खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके पालघर जिल्ह्यात गठित करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांना बी- बियाणे विक्री करताना बनावट कंपन्यांची बियाणे विकणे, खताची साठवणूक करून काळाबाजार करणे, बियाणे कीटकनाशकांच्या विक्रीत फसवणूक करणे अशा अनेक तक्रारी दरवर्षी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये सोबतच त्यांना दर्जेदार बियाणे, खत, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी भरारी पथक नेमण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख म्हणून कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी हे असणार आहेत. या पथकात विश्वास बर्वे, ए.जे. राऊळ , काकासाहेब भालेकर आणि लक्ष्मण लामकाने यांचा समावेश आहे.
तसेच प्रत्येक तालुक्यात तालुका कृषि अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी (पथक प्रमुख), तर कृषि अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषि अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे.