
ठाणे: कोरोनाने पुन्हा एकदा आपली दहशत गाजवायला सुरुवात केली आहे. तीन वर्षापूर्वी पूर्ण जगात हाहाकार पसरवणाऱ्या या महामारीने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. भारतात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच, ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. ठाण्यात अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही एक मोठी चिंतेची बाब असून, यानंतर सर्वांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालं. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी होता, ज्याचा शनिवारी सकळी 6 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्याला 22 मे रोजी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही 185 पर्यंत पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत या रुग्णसंख्येत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून केले जात आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असे सांगितले जात आहे. सोबतच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे देखील आवाहन केले जात आहे.