Friday, May 23, 2025

रिलॅक्स

वादळात पडलेली झाडे झाली पुन्हा जिवंत?

वादळात पडलेली झाडे झाली पुन्हा जिवंत?

फिरता फिरता:मेघना साने


लिबागच्या जवळ पोयनाड पेजारीमध्ये जे बांधण गाव आहे तेथे वादळ झाले, तेव्हा बरीच झाडे मुळापासून उखडली होती. या साऱ्या झाडांचे लाकूड वाया जाणार की काय, अशी जवळच असलेल्या इलाईट रिसॉर्टचे मालक सुनील चावंडे यांना चिंता वाटू लागली. त्यांनी मनात काहीतरी बेत योजून अमित घोणे यांच्याशी संपर्क केला. ‘आपण काष्ठ शिल्पकार स्वर्गीय रमेश घोणे यांचे सुपुत्र आहात ना? आपले पिताश्री नैसर्गिक खोडांपासून शिल्पे तयार करीत असत. आपण आमच्या रिसॉर्टमध्ये या आणि या पडलेल्या झाडांपासून काही बनवता येईल का पाहा.’ अमित घोणे आपल्या दोन-तीन कुशल कामगारांना घेऊन गेले. पडलेल्या झाडांची पाहणी केली. त्यात त्यांना निरनिराळी चित्रे दिसू लागली. हे काम करता येण्याजोगे होते. अमित घोणे यांचे पिताश्री रमेश घोणे हे प्रसिद्ध काष्ठ शिल्पकार होते. त्यांनी झाडांपासून घडवलेल्या शिल्पांचे एक देखणे म्युझियम कोलाड येथे अमित घोणे यांनी उभारले आहे. रमेश घोणे यांना आदरांजली म्हणून रिसॉर्टचे मालक सुनील चावंडे यांनी अमित घोणे यांना या पडलेल्या झाडांपासून काष्ठ शिल्पे साकारण्याचे काम दिले. अमित घोणे यांनी साधारण दीड दोन महिन्यांत या झाडांपासून एकूण चाळीस शिल्पे बनवली. त्यांनी साकारलेला गणेश तर अतिशय सुबक दिसत होता. शिवाय अनेक पक्षी, प्राणी त्यांनी साकारले. कमीत कमी प्रोसेसिंग करून त्यांनी ही शिल्पे साकारली. ही शिल्पे रिसॉर्टमध्ये शोभून दिसतीलच तर काही कोणाच्या दिवाणखान्यालासुद्धा शोभा आणतील. अशा तऱ्हेने अमितने जीव ओतून ओतून तयार केलेली ही शिल्पे आता वर्षानुवर्षे जगतील. म्हणजे एक प्रकारे झाडे पुन्हा जिवंत झाली असे म्हणता येईल ना?


आता थोडेसे अमित घोणे यांच्या कोलाड येथील काष्ठ शिल्प संग्रहालयाबद्दल सांगते. माणगावच्या पुढे कोलाड येथे पर्यटकांनी जरूर पहावं असं प्रसिद्ध शिल्पकार रमेश घोणे यांचे नैसर्गिक काष्ठशिल्प संग्रहालय उभे आहे. स्वतः रमेश घोणे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी एका दुमजली बंगलीत थाटलेले हे काष्ठशिल्पांचे प्रदर्शन म्हणजे झाडांच्या खोडातून नैसर्गिकपणे साकारलेल्या वस्तू आहेत. रमेश घोणे यांच्या पश्चात त्यांच्या सर्व कलाकृती जपून ठेवण्यासाठी अमितने काष्ठ शिल्प संग्रहालयाची अतिशय सुंदर मांडणी केली आहे. एकाच माणसाने तयार केलेल्या या अनेक कलाकृती आपल्याला केवळ स्तिमित करून टाकतात. झाडाच्या खोडांमधून कलाकृती निर्माण करण्याचा हा छंद घोणे यांनी पन्नास वर्षे जोपासला होता. सत्तरीच्या जवळपास असताना त्यांना हृदयविकाराने गाठले आणि काळाने हिरावून नेले. पण त्यांच्या या सर्व कलाकृती आठवणी म्हणून कायमस्वरूपी जपण्याचा संकल्प त्यांचे पुत्र अमित यांनी केला आहे.
रमेश यांच्या वडिलांची लाकडाची वखार होती. त्यासाठी झाडांची खोडे आणली जायची. त्यात रमेश यांना निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे आकार दिसू लागले व त्यातून त्यांनी कलाकृती निर्माण करायला सुरुवात केली. यासाठी फारशा अवजारांची आवश्यकता भासली नाही. कारण मूळ आकारातच त्यांना चित्र दिसत होते. थोडे फेरफार करून टिकवूड पॉलिशने पेंट केले.


आम्ही ते संग्रहालय पाहण्यासाठी अमित यांना भेटलो. ते आम्हाला रमेश यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेथे घोणे यांनी तयार केलेल्या विशिष्ट प्रकारच्या लाकडी खुर्च्या होत्या. त्यावर बसल्यावर पाठीला एकदम आराम मिळतो. खुर्च्या, टीपॉय, प्लांट्स ठेवण्याचे शोभेचे स्टॅन्ड अशा अनेक वस्तूंची दाटी तेथे होती. “यातील काही वस्तू वि. वा. शिरवाडकर यांनी आपल्या घरासाठी खरेदी केल्या होत्या.” असे अमित यांनी सांगितले. नंतर प्रत्यक्ष संग्रहालय पाहायला गेलो तेव्हा तर एका वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटले. अनेक प्राणी पक्ष्यांच्या हुबेहूब लाकडी कलाकृती तिथे दिसत होत्या. “सृष्टी आणि दृष्टी एकत्र आले तर अशी कलाकृती घडून येते.” अमित सांगत होते.


गरूड, मुंगूस, घोडे यांच्याबरोबरच काही संकल्पना मांडणारी शिल्पेही होती. उदाहरणार्थ, गणपती खांद्यावर घेऊन चाललेला माणूस, हसतखेळत पावले टाकणारा मुलगा, चिंतन करणारा मुलगा इत्यादी. ही सर्व शिल्पे अखंड लाकडाची होती. काही शिल्पे संदेश देणारीही होती. आठ बाय चारच्या एका मोठ्या लाकडाच्या पाटीवर खालच्या भागात मदत मागणारे दोन हात आणि वरच्या बाजूला बेड्या घातलेले दोन हात यातून संदेश दिला होता की, बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. तसेच एका मोठ्या खोडावर दोन स्त्रियांची शिल्पे होती. त्यांची केशभूषा व वेशभूषा पारंपरिक दिसत होती. त्यांच्या भोवती दोरी गुंडाळलेली होती. हे सर्व लाकडाचेच बरे का! या बंधनात असलेल्या स्त्रिया होत्या. याशिवाय दीपमाळ, ड्रेसिंग टेबल अशा वस्तूही लाकडातून बनवलेल्या होत्या. हे सर्व बनविण्यासाठी साग, आंबा, फणस, खैर, चिंच अशी कोणत्याही झाडाची खोडे किंवा फांद्या वापरण्यात आल्या होत्या. एका झाडाला तर गाठ आली होती. त्यातून गरूड साकारला होता. मुंग्यांनी पोखरलेले झाडसुद्धा उपयोगात आणलेले होते. एक आश्चर्यकारक कलाकृती मला दिसली. तेथे भिंतीवर एक पोस्टाची पेटी होती. पोस्टाची पेटी घरात कशी काय असे आश्चर्य व्यक्त केल्यावर अमितने सांगितले की ही सुद्धा लाकडाची कलाकृती आहे.


“या सर्व कलाकृतींवर वडिलांचा जीव होता. त्यामुळे या कितीही किमती असल्या तरी मला त्या विकायच्या नाहीयेत, अमित सांगत होते. ‘फक्त खुर्च्या, टीपॉय अशा उपयोगी वस्तू आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करू. बाकी सर्व कलाकृती एक संग्रहालय म्हणून जपून ठेवू.’ या काष्ठशिल्प संग्रहालयाचे उद्घाटन १९९७ सालीच झाले होते. आपल्या कोकणातील हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय कीर्तिचेही होऊ शकते. कलेची कदर असणाऱ्यांनी या परिवाराला पाठिंबा द्यावा.
-

Comments
Add Comment