
अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपट उडवली (Sindhudurg Rain) आहे. अवकाळी पावसामुळे उद्भवणाऱ्या आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) 'अलर्ट मोड' वर आहेत. पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याच्या उपाय योजनांसाठी आणि संभाव्य परिस्थितीपासून रक्षण करण्यासाठी नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (District Disaster Management Authority meeting) बैठक संपन्न झाली.
या बैठकीत नितेश राणे यांनी, सर्व आपत्कालीन यंत्रणाना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "पावसामुळे वीज संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने या विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहून वीज पुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी. भविष्यात महावितरणच्या दुरूस्ती कामांसाठी विशेष पॅकेज आणणार असून या पॅकेजमधून जिल्ह्यतील वीजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल. तसेच डिसेंबर अखेर भूमिगत वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात येईल."
वीज, रस्ते आणि वाहतूक दुरावस्थेची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश
त्याचप्रमाणे या बैठकीत पालकमंत्री राणे यांनी पावसामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेची कामे तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश देखील दिला आहे. कामाच्या दर्जेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे देखील ते पुढे म्हणाले. शिवापूर, वसोली, उपवडे, आंजिवडे, दुकानवाड या गावांचा संपर्क तुटलेला असून एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तसेच या भागात वीज, मोबाईल नेटवर्क नसल्याचे गावकऱ्यांच्या तक्रारी असल्याने या संदर्भात संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच, दुकानवाड येथे पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था सुरू करावी. घाट क्षेत्रात दरडी कोसळल्यास संबंधित यंत्रणांनी तात्काळ त्याठिकाणी भेट कोसळलेली दरड बाजूला करुन घाट रस्ता सुरू करावा. संबंधित कंत्राटदारांनी त्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात ठेवावे. ज्या ठिकाणी वारंवार दरडी कोसळतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे- नितेश राणे
आरोग्य यंत्रणेविषयी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करावे, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच कोविडच्या अनुषंगाने देखील नागरिकांनी काय काय खबरदारी घ्यावी याविषयी जन जागृती करावी. वन विभागाने यापुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कामे संपवावीत. रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत येाग्य ते नियोजन करावे. तेसच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या बाजूला करण्यात याव्यात. संबंधित कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात जिल्हाभरात फिरून परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजना कराव्यात. एसटी विभागाने देखील पावसामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. नगर पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे तात्काळ हाती घ्यावीत जेणेकरुन स्वच्छता राहिल. नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करावा. जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचार विनिमय करावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याचा आजचा एकूण पाऊस ५८६.४ मि.मी. तर सरासरी पाऊस ७३.३ मि.मी. नोंदवला गेला. विशेषतः कणकवली आणि वेंगुर्ला तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कणकवली तालुक्यात सर्वाधिक १३० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर त्यापाठोपाठ वेंगुर्ला तालुक्यात १११.४ मि.मी. पाऊस कोसळला. देवगडमध्ये १०२ मि.मी. आणि वैभववाडीत ८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोडामार्ग तालुक्यात ४१ मि.मी., सावंतवाडीत ३८ मि.मी., कुडाळमध्ये ४४ मि.मी. आणि मालवणमध्ये ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ( Sindhudurg heavy rain alert) या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. अनेक ठिकाणी उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीकिनारी आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांत जिल्ह्यात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.