कोची : लायबेरियन ध्वज असलेले कंटेनर जहाज MSC ELSA 3 केरळच्या विझिंजम बंदरातून निघाल्यानंतर कोचीच्या किनाऱ्याजवळ शनिवारी उलटले. या गंभीर सागरी दुर्घटनेने खळबळ उडवली आहे. जहाजावरील २४ क्रू मेंबर्सपैकी ९ जणांनी जहाज सोडले असून, उर्वरित १५ जणांसाठी बचावकार्य सुरू आहे.
ही घटना कोचीपासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात घडली. जहाजाने मदतीसाठी तातडीचा संदेश दिल्यानंतर भारतीय तटरक्षक दल (ICG) सक्रिय झाले आणि हवाई तसेच समुद्री बचाव मोहीम राबवू लागले.
बचाव मोहिमेत ICG कडून बचावासाठी जहाजं आणि विमाने तैनात केली असून जहाजाजवळ अतिरिक्त लाईफराफ्ट्स टाकण्यात आले आहेत. यात ९ जण लाईफराफ्टमध्ये सुरक्षित असून उर्वरित १५ जणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जहाजावर काही धोकादायक रसायनं असण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर संभाव्य पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगली जात आहे.
नौवहन महासंचालनालय आणि भारतीय तटरक्षक दल यांनी जहाज व्यवस्थापनाला तातडीने मदतीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोणतीही जीवितहानी किंवा पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.