बालनाट्ट्यांनी मारली बाजी

  49

भालचंद्र कुबल :पाचवा वेद

यांदाचा बालनाट्याचा सीजन निर्मात्यांना चांगलाच लाभलाय अशी चर्चा सुरू असतानाच त्याचा ऊहापोह केलेला बरा असतो, कारण या सुगीचा निदान लिखित संदर्भ पुढे मागे वापरला जाऊ शकतो. कोविड पश्चात रंगभूमीवर जे नैराश्य पसरलं होतं त्यात प्रामुख्याने बालनाट्य होरपळून निघत होती. अर्थात मुलांची सेफ्टी हा जरी पालकांचा प्रमुख मुद्दा असला तरी पर्याय म्हणून टीव्ही मीडियावरील बालांसाठी उपलब्ध असलेल्या मनोरंजन विश्वात त्यांना गुंतवून ठेवता येत होते. मात्र या माध्यमांवरचा स्टॉक पुढील काही वर्षात संपला आणि हळूहळू बालनाट्ये डोकं वर काढू लागली. बालरंगभूमीच्या इतिहासात डोकावल्यास काही महत्त्वपूर्ण माहिती हाती लागते. साधारणपणे १९५९ साली मुंबई मराठी साहित्य संघ मंदिरच्या आधाराने सुधा करमरकरांनी ‘मधुमंजिरी’ नामक पहिले, मराठी बालनाट्य रंगभूमीवर सादर केले. पुढे सुधाताईंनी ‘लिटील थिएटर’ नामक स्वतःची संस्था स्थापन करून ‘स्नोव्हाईट आणि सात बुटके’, ‘चिनी बदाम’, ‘कळलाव्या कांद्याची गोष्ट’ इत्यादी अनेक सुपरहिट नाटके देऊन, महाराष्ट्रभरात दोन हजारांपेक्षा जास्त प्रयोग या नाटकांचे केले. १९६३च्या काळात रत्नाकर मतकरी आणि प्रतिभा मतकरी यांनी ‘बालनाट्य’ या स्वतःच्या संस्थेद्वारे ‘अचाट गावची अफाट मावशी’, ‘इंद्राचे आसन, नारदाची शेंडी’, ‘अलबत्त्या गलबत्त्या’ अशी अनेक दर्जेदार बालनाट्ये या दाम्प्त्यानी निर्माण केली. १९६६च्या सुमारास नरेंद्र बल्लाळ आणि कुमुदिनी बल्लाळ यांनी ‘नवल रंगभूमी’ या नव्याने स्थापित केलेल्या, त्यांच्या संस्थेमार्फत ‘मंगळावर स्वारी’ या पहिल्या सायफाय नाटकाची निर्मिती करण्यात मोठे यश मिळाले. विज्ञानावर आधारभूत कथाबीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे. पुढे बल्लाळांनी ‘राजाला फुटले पंख’, ‘बोलका बाहुला’, ‘एक होता जोकर’ इत्यादी लोकप्रिय बालनाट्यांची यशस्वी निर्मिती केली. बालनाट्यांमध्ये ट्रिक सीन्सचा प्रथम वापर बल्लाळांच्या ‘नवल रंगभूमी’ने केला. १९७०च्या सुमारास वंदना विटणकर आणि त्यांचे चित्रकार पती चंद्रकांत विटणकर यांनी वंदना थिएटर्सतर्फे ‘टिमटिमटिम्बू बम बम बगडम्’, ‘परिकथेतील राजकुमार’, ‘रॉबिनहूड’ अशी विविध विषयांची बालनाट्ये सादर केली. नेपथ्य अर्थात चंद्रकांत विटणकर यांचे असायचे. ‘परिकथेतील राजकुमार’ या बालनाट्यातील नेपथ्य अतिशय देखणे होते. रंगमंचावर एक मोठा वृक्षराज होता. खोडाला नाक व डोळे आणि पांढरी दाढी होती. वृक्ष जागा झाला की, डोळे उघडले जायचे. फांद्या पसरल्या जायच्या व त्यानंतर धीरगंभीर आवाजात तो बोलू लागायचा. आजूबाजूच्या झुडपांवर फुलपाखरे उडताना दिसायची. फुले डोलू लागायची. वंदनाताई आणि सुधाताई यांच्या बालनाट्यात देखणे नेपथ्य आणि हमखास छान छान गाणी असायची. १९७५ साली विजू नवरे लिखित बालनाट्यातील पहिला फार्स ‘जाड्या, रड्या आणि चमच्या’ या नावाने रंगभूमीवर आणला. याचे दिग्दर्शन केले होते, अशोक पावस्करांनी. बालनाट्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. बालप्रेक्षकांचे मनोरंजन करता करताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात. या नाटकांत केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहानमोठ्या वयाची माणसे, प्राणी, पक्षी, राक्षस, भुते यांतले काहीही असू शकते. लोककथा, परीकथा, साहसकथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात. अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी दिग्दर्शकाला प्रत्यक्ष मुलांच्या डोळ्यांनी व मनाने नाटकाकडे बघावे लागते. ठाशीव कथासूत्र, सोपे, चटकदार आणि चटपटीत संवाद हे या नाटकांचे वैशिष्ट्य असते. मुलांचे भाषाज्ञान प्रौढांइतके प्रगल्भ नसल्याने नाटकांत संवादापेक्षा प्रकाशयोजना, कथेला अनुसरून वातावरणनिर्मिती, पात्रांची वेषभूषा आणि रंगमंचव्यवस्थापन यांकडे अधिक लक्ष दिलेले असते. मुलांना जास्त ताण सहन होण्यासारखा नसल्याने नाटकातले वातावरण हलकेफुलके असते..! गेल्या दोन तीन वर्षांतली बालनाट्ये ही याच पारंपरिक साच्यातील आहेत. दोन अंकी पॉवरपॅक मनोरंजन करणारी आणि सध्या रंगभूमीवर गाजणारी अलबत्या गलबत्या, आज्जीबाई जोरात आणि अंजू उडाली भूर्रर्र ही तीन महत्त्वाची नाटके आहेत. अलबत्या गलबत्या या एव्हरग्रीन नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यानी लेखाच्या निमित्ताने आपली मते मांडली. सध्याची परिस्थिती नाट्यव्यवसायाला अजिबात पोषक नाही. परंतु तुमच्या प्रॉडक्टमधे दम असल्यास त्याला कोणीही थांबवू शकत नाही. अलबत्त्या गलबत्त्याला रिपिट ऑडीयन्सच एवढा आहे की अजून पुढील काही प्रयोग या नाटकाला केवळ त्यातील मनोरंजक कंटेंटमुळे मरण नाही. लहान मुलांची नस सापडलेलं हे नाटक आहे. भविष्यात हेच नाटक इंग्रजी आणि हिंदी भाषांमधूनही आणायचा त्यांचा विचार आहे. जनरली एका मुलाला नाटक दाखवण्यासाठी पालकांनाही ते नाटक सोबत म्हणून पहावे लागते. मात्र तिकीट दरात सवलत ठेवल्याने प्रेक्षकांचा ओढा वाढू शकतो असा अंदाज वर्तवताना “अंजू उडाली भुर्रर्र”चे प्रमुख कलाकार अंकुर वाढवे यानी सांगितले. राजेश देशपांडे हा एक भन्नाट ताकदीचा दिग्दर्शक आहे. तो मल्टीटास्कर आहे. एकाच वेळी अनेक स्तरांवर चाललेले त्यांचे टास्किंग चक्रावून सोडणारे आहे. तो लेखन करतो, दिग्दर्शन करतो, अभिनय करतो, उरलेला वेळ वाया जाऊ नये म्हणून बालनाट्य शिबिरे घेतो आणि बालनाट्यातील मुलांना यथायोग्य प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून त्यांना घेऊन “अंजू उडाली भुर्रर्र”सारखं बालनाट्य देखिल दिग्दर्शित करतो. आज मितीला अलबत्या गलबत्या सारखं नाटक चिन्मय मांडलेकरांच्या तर आज्जीबाई जोरात सारखं नाटक क्षितीज पटवर्धन सारख्या तगड्या दिग्दर्शकांच्या वाट्याला आली आहेत. हे खरं तर आजच्या नव्या पिढीच्या रूपाने जन्माला आलेल्या बालकलाकारांचे नशिबच म्हणावे लागेल. थोडक्यात दर्जेदार बालनाट्यांचे दर्जेदार प्रयोग हे सूत्र तेव्हाही होते आणि आजही आहे. “आज्जीबाई जोरात” या नाटकात तर आधुनिकता वेगवेगळ्या स्वरूपात लहान मुलांच्या वैचारिक क्षमतेला खाद्य पुरवते एवढेच नाही तर जाता जाता एक संदेश देखील देते, त्यामुळे लोकप्रियतेमध्ये नंबर वन असलेले हे नाटक पहिले मल्टीस्टार कास्ट ठरले आहे. बालनाट्य हे बालनाट्यच असावे. त्यातील विषय आशय हा बालकांच्या बुद्धीला पेलवणाराच असावा, त्यातही त्यांचे प्रयोगमूल्य हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या खिशाला परवडणारे असावे. नाटक दोन अंकी आहे म्हणून व्यावसायिक नाटकाचे निकष बालनाट्यांना लावता येणार नाहीत. मराठी नाटक जसे जिवंत राहावे म्हणून अनुदान दिले जाते तसे बालनाट्याच्या अनुदानालाही मूर्त स्वरूप आल्याची घोषणा मध्यंतरी आशीष शेलार आणि राहुल भंडारेंच्या पुढाकाराने अमलात आणली जाणार असल्याचे विविध प्रसार माध्यमांतून जाहीर झाले होते, त्याचा पाठपुरावा करण्यात यावा असे मत बालनाट्याच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या मंदार टिल्लू यांनी मांडले. अनेक सकारात्मक गोष्टी यंदाच्या वर्षी बालनाट्याच्या पथ्यावर पडल्या आहेत. भरमसाट बालनाट्ये यंदाच्या वर्षी कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे उगवली नाहीत, त्यामुळे दरवर्षी नाट्यशिबिरांमुळे माजणाऱ्या बालनाट्यांच्या बजबजपुरीला यंदा आळा बसला व दर्जेदार आणि मोजकीच नाटके बालप्रेक्षकांच्या वाट्याला आली आणि म्हणूनच की काय यंदाचा बालनाट्य सीझन बऱ्यापैकी कमाईचा ठरतोय..!
Comments
Add Comment

Face Cake Smash Trend: मित्रांच्या वाढदिवसानिमित्त कधीही करू नका अशी मस्करी, जाऊ शकतो जीव, पहा हा Viral Video

Face Cake Smash Trend: आजकाल वाढदिवस म्हंटला की, प्रत्येकजण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतात, लेट नाईट पार्ट्या केल्या जातात.

राजिंदर नाथ

मराठी नाटकांना हिंदीत नेणारा रंगकर्मी भालचंद्र कुबल : पाचवा वेद गेल्या आठवड्यात अखिल भारतीय नाट्यसृष्टीतील

श्रीमंत भिकाऱ्याची गोष्ट

मनभावन : आसावरी जोशी आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलावेसे वाटले... बऱ्याच जणांना असे वाटेल की मी हा विषय का निवडला...?

स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा ‘विराट’

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  ‘अवकारिका’ या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारा व दक्षिणात्य

एक रंगमंच, दोन दीर्घांक आणि संयुक्त ‘प्रयोग’...

राजरंग : राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. यात प्रायोगिक रंगभूमीचा वाटा मोठा आहे.

भारतीय नाट्यसृष्टीचे मूळ मोठे करणारे रतन

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मध्यंतरी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. त्यात रतन थिय्याम यांचा फोटो