
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉईंटजवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून तब्बल १८ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. २२ मे) उघडकीस आली.
या प्रकरणी मयूर संजय महाजन (वय ३०, वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम विभागाचे मॅनेजर असून त्यांना गुरुवारी सकाळी त्यांच्या सफाई कर्मचाऱ्याने माहिती दिली की एक्सलो पॉईंटजवळील बँकेच्या एटीएम मशीनचे दरवाजे तुटलेले दिसत आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
पोलिसांसमवेत महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तीन एटीएम मशीनपैकी एका मशीनचे दरवाजे गॅस कटरच्या सहाय्याने उघडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामधील रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. सदर मशीनमध्ये १९ मे रोजी एकूण १० लाख रुपये भरले गेले होते. यापूर्वी ग्राहकांनी १.१५ लाख रुपये काढले होते. तर मशीनमध्ये एकूण १८.७६ लाख रुपये शिल्लक होते. ही संपूर्ण रक्कम चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
चोरीस गेलेल्या रकमेचे स्वरूप ५०० रुपयांच्या ३७५२ नोटांमध्ये असून, चोरी कधी झाली याबाबतचे अंदाजे वेळ रात्री १२ ते सकाळी १० दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शेवाळे हे या प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे गोळा करून तपासाची दिशा ठरवली जात आहे.