Friday, May 23, 2025

रिलॅक्स

अशोक मुळ्येकाका, एक भन्नाट अवलिया !

अशोक मुळ्येकाका, एक भन्नाट अवलिया !

योगेश वसंत त्रिवेदी:ज्येष्ट पत्रकार


नमस्कार! या बरं झालं तुम्ही आलात. मी फक्त कळवलं. मला मेसेज पाठवता येत नाही. ते काम कल्पना आणि शेखर करताहेत. महेशही करतोय मदत. बरं, खाली चहाची व्यवस्था केली आहे. चहा प्यायलात का? जा पहिल्यांदा चहा घेऊन या. ही खारी घ्या. गिरगावातली आहे. साखर पण आहे त्यात. हां, शुगर फ्री शुगर. ३ ते ४ चहापान. मग ४ वाजता आपला कार्यक्रम सुरू. ए बाळा, तो पडदा बरोबर लाव. लाईट बरोबर लागला पाहिजे. बॅनर बरोबर आहे ना? मुद्दामच लिहिलंय ‘अध्यक्ष’ नसलेलं माझं पत्रकार संमेलन. झंझट नको. सगळं मी करतोय. माझ्या मनाप्रमाणे. कुणाकडून पैसा घेऊन खिशात टाकणारा नाही. व्यवहार चोख. हां, श्रीरंग, बरं झालं बाबा वेळेवर आलास. कार्यक्रम वेळेवर सुरू झाला पाहिजे.” अशा पद्धतीने एकच पांढऱ्या शुभ्र कपड्यातली व्यक्ती हातात एक पिशवी नाचवत बोलत असते ती म्हणजे अशोक मुळ्ये काका!


अशोक मुळ्ये काका हे एक प्रथितयश रंगकर्मी म्हणून ओळखण्यात येतात. जशा नाट्यक्षेत्रात विविध रंगांच्या छटा आहेत तद्वतच पत्रकारिता, साहित्य, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात विविध रंगांच्या छटा आहेत.


अशोक मुळ्येकाका यांनी ‘अध्यक्ष’ नसलेले पत्रकार संमेलन भरविले. त्यात पत्रकारितेतील साहित्य, राजकारण, नाट्य, चित्रपट, गुन्हेगारी अशा क्षेत्रांत वृत्तसंकलन करणारे, विश्लेषण करणारे तसेच संपादक अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वांना अशोक मुळ्येकाका यांनी पाचारण केले होते. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्येकाका यांच्या रुपाने एक जबरदस्त भन्नाट अवलिया आज आपल्यात आहे. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ‘अध्यक्ष’ नसलेले ‘माझे’ एकमेव पत्रकार संमेलन अशोक मुळ्येकाका यांनी आयोजित केले. कुणीतरी म्हटले की एवढी ‘मिसाईल्स’ एकत्र आणण्याचे काम एकट्या मुळ्येकाका यांनी केले. सगळे बाण, सगळी शस्त्रे एकाच ‘भात्यात’ राहू शकतील असा एकमेव ‘भाता’ हा मुळ्येकाकांचाच असू शकतो. कारण तसे पहायला गेले तर दोन पत्रकार एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत.


एक पत्रकार दुसऱ्याबद्दल चांगले बोलतांना सहसा आढळत नाही. बरे, न्यायमूर्ती सुद्धा या सभागृहात एखाद्या विनयशील, आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आवर्जून उपस्थित राहतात, ते केवळ आणि केवळ अशोक मुळ्येकाका यांच्याच प्रेमामुळे. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी हे या पत्रकार संमेलनाला आले आणि त्यांनी सुस्पष्टपणे सांगितले की, बाबांनी सांगितले आहे की अशोकच्या कार्यक्रमाला न चुकता हजर राहात जा. कारण त्याचे कार्य फार मोठे आहे, तो स्वच्छ चारित्र्याचा आहे, याचाच अर्थ तो एकही पैसा खात नाही. कार्यक्रमाला जेवढे लागतील तेवढेच पैसे जमवतो आणि कार्यक्रम करून ज्याचे पैसे त्याला न चुकता चुकते करतो.


शिडशिडीत बांध्याचे, पांढऱ्याशुभ्र कपड्यात, (विजार पांढरी त्यात शर्ट खोवलेला) प्रारंभापासूनच वावरणारे. हल्ली पांढरे शुभ्र कपडे घालणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी पांढऱ्याशुभ्र विजारीवर पांढरा शर्ट तोही दोन्ही हातावर कोपऱ्यापासून दुमडलेला, डोळ्यांवर चष्मा आणि आवाजात जरब. जे काय बोलायचे ते ताड की फाड, कुणाची हयगय नाही, कुणाची पत्रास नाही. अभिजीत देसाई यांनी लोकप्रभेत म्हणूनच ‘पांढरा दहशतवादी’ या शीर्षकाखाली अशोक मुळ्येकाका यांच्यावर लेख लिहिला होता. त्याची आठवण अनेकांनी करून दिली. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्यापासून तर पत्रकारितेतील असंख्य दिग्गजांनी प्रेमपूर्वक हजेरी लावून काकांचा सन्मान ठेवला. ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी सकाळी सुद्धा अनेकांना भ्रमणध्वनीवरून येण्याचे आपल्या खास शैलीत आमंत्रण देतांना, मला संदेश पाठवता येत नाही. आपण एकटेच या, कुणाला बरोबर आणू नका. पंगत आहे. ठरावीक पानेच सांगितली आहेत. जेवल्याशिवाय जायचे नाही, असे परखडपणे एका दमात काकांनी सांगून टाकले. नाही म्हणायला महेश म्हात्रे, कल्पना राणे आणि शेखर जोशी यांनी अशोक मुळ्येकाका यांची संदेशांची ती बाजू चांगल्याप्रकारे सांभाळली होती.


रंगमंच हा निव्वळ अशोक मुळ्येकाका यांचाच. लेखन त्यांचे, वाचन /निवेदन/सूत्रसंचालन त्यांचे, नेपथ्य त्यांचे, सर्वकाही त्यांचेच. सगळा एकहाती कारभार. सर्वच क्षेत्रातील मान्यवर पत्रकार आवर्जून आले होते आणि काकांनी दरवाजे लावून घेतल्याने भोजनाशिवाय कुणी बाहेर पडू शकत नव्हता. श्रीखंड पुरीचा बेत होता आणि पापड, लोणचे, चटणी, रायत्यापासून सारे पदार्थ काका स्वतः वाढप्याच्या भूमिकेतून वाढत होते. ख्यातनाम वकील सचिन सावंत यांनी दिलेले मदतीचे पन्नास हजार रुपये जसेच्या तसे काकांनी रंगमंचावर बोलावून ॲड. सचिन सावंत यांच्या हाती सुपूर्द केले. प्रख्यात गायक श्रीरंग भावे, गायिका दंत शल्यचिकित्सक डॉ. शिल्पा मालंडकर, गायिका विद्या करलगीकर यांनी तबला पेटीच्या साथीने बाबूजी सुधीर फडके, जगदीश खेबुडकर, आशा भोसले, आदींच्या सुरेल गाण्यांच्या मैफलीने वातावरणात रंगत आणली. या गायक गायिकांनीही अशोक मुळ्येकाका यांच्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे ऐकण्याचे काम केले. अशोक मुळ्येकाका यांचा प्रेमरूपी आसूड प्रत्येकजण लीलया झेलत होता. अशोक मुळ्येकाका यांनी आपल्या सत्तर वर्षांच्या नाट्यसेवेत असंख्य अनोखे प्रकार करून दाखविले आणि सर्वांनी त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला.


जुन्या नव्या अभिनेत्री, अभिनेते यांना रंगमंचावर सन्मानित केले. मराठी रंगमंचावर वावरणारा प्रत्येक अभिनेता, अभिनेत्री हा अशोक मुळ्येकाका यांच्या जवळचा होता आणि आजही आहे. नाट्य समीक्षक म्हणजे तर अशोक मुळ्येकाकांचा खास. या प्रेमापोटी अनेक जण पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातून हजेरी लावून गेले. एकखांबी तंबू म्हणजे काय ते अशोक मुळ्येकाका यांच्याकडे पाहून कळते. मुळ्येकाका हे खरोखरीच एक जगावेगळे रसायन आहे. झाले बहु होतील बहु… पण अशोक मुळ्ये काकांसारखा दुसरा होणे नाही.

Comments
Add Comment