
विरार : वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेत १ जूनपासून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.
त्याच धर्तीवर महापालिकेने सुद्धा महापालिका क्षेत्रातील महिलांना मनपाच्या परिवहन सेवेत सवलत द्यावी अशी मागणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
त्यानुसार १ जूनपासून वसई-विरार महापालिका क्षेत्रात चालणाऱ्या महापालिकेच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी घेतला आहे. या निर्णयाबाबत त्यांनी आमदारांना सुद्धा कळविले आहे.