
बीड: गेल्या काही महिन्यांपासून पवनचक्की प्रकल्प वादग्रस्त ठरले आहेत. खंडणी, फसवणूक, वाद-विवाद आणि गुन्हेगारीमुळे या प्रकल्पांकडे वारंवार लक्ष वेधले जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांवर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्की प्रकल्पावर, चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याने एका चोरट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, अन्य चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी प्रकल्पस्थळी चोरीच्या उद्देशाने घुसखोरी केली होती. सदर ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांच्या ही बाब लक्षात येताच, चोरट्यांना थांबवण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षकाने त्यांवर गोळीबार केला. दरम्यान एका चोरट्याला गोळी लागून तो जागीच ठार झालं, तर त्याचे अन्य साथीदार फरार होण्यास यशस्वी झाले.
पोलिसांकडून सध्य प्रकरणाचा तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, पंचनामा करण्यात आला आहे. चोरी करण्यास आलेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सुरक्षारक्षकाने नेमका गोळीबार का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांच्या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.