Friday, May 23, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

Monsoon Update: येत्या ४८ तासांत मान्सून धडकणार! शाळा सुरू होण्याआधीच पावसाची हजेरी लागणार

Monsoon Update: येत्या ४८ तासांत मान्सून धडकणार! शाळा सुरू होण्याआधीच पावसाची हजेरी लागणार

मुंबई: सध्या राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला असताना, लवकरच नैऋत्य 'मान्सून'चे आगमन होणार आहे. एकेकाळी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहायला लावणारा मान्सून येत्या ४८ तासांत केरळमध्ये दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. त्यामुळे २५ मे पर्यंत भारतात मान्सून धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे.


दरम्यान, दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, जे सध्या स्थिर आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.  आज मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून,  हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता


पुढील दोन दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र 23 मे च्या संध्याकाळपर्यंत तीव्र होऊन अवदाबमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड) आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



रायगड-रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट


आज, दिनांक 23 मे रोजी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.

Comments
Add Comment