
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यानंतर वैष्णवीच्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबाला मिळाला आहे. बाळ वैष्णवीच्या माहेरी सुरक्षित आहे. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे. पण वैष्णवीच्या बाळाची म्हणजेच जनकराजेची तब्येत अचानक बिघडली. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यावर हगवणे कुटुंबाने जनकराजेचाही छळ केल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळाला एका व्यक्तीकडे सोपवण्यात आले होते. बाळाचा ठावठिकाणा कोणालाही लवकर कळू नये यासाठी बाळाला सतत गुंगीचे इंजेक्शन देऊन झोपेतच ठेवले जात होते. जेमतेम नऊ महिन्यांच्या बाळाला सतत तीन दिवस गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले होते. या सततच्या इंजेक्शनचा प्रतिकूल परिणाम झाला आणि बाळाच्या कंबरेजवळ गाठ आली. जनकराजेच्या कमरेला गाठ आल्याचे लक्षात येताच कस्पटे कुटुंबाने बाळाला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीतून बाळावर झालेल्या अत्याचाराचा अंदाज आल्याचे कस्पटे कुटुंबाने सांगितले.