
पुणे : पैशांसाठी सतत छळणाऱ्या हगवणे कुटुंबाच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आज म्हणजेच शुक्रवार २३ मे रोजी हगवणे बापलेकाला अटक केली. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली.
राजेंद्र आणि सुशील एका हॉटेलमध्ये जेवतानाचे सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या हाती आले. फूटेजमध्ये राजेंद्र आणि सुशील हॉटेलमध्ये मटण खाताना दिसत होते. यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई केली. झोपेत असलेल्या हगवणे बापलेकाला जागं करुन पहाटे साडेचार वाजता अटक केली. दोघांना तातडीने पोलीस उपायुक्त कार्यालयात नेण्यात आले. पोलीस दोघांनाही पुढील २४ तासांत न्यायालयात हजर करणार आहेत.
वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. काल रात्री राजेंद्र यांचा भाऊ संजय हगवणेला अटक करण्यात आले. वैष्णवीने छळाला वैतागून टोकाचे पाऊल उचलल्याची बातमी येताच राष्ट्रवादी काँग्रेसने हगवणे कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी वैष्णवीच्या आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, असे जाहीर केले. यानंतर सूत्रं वेगाने फिरली. आतापर्यंत वैष्णवी हगवणे प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे म्हणजेच कस्पटे दांपत्याकडे देण्यात आला आहे.
पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे.